अनेक जागतिक तज्ञांचा अभ्यासपूर्ण अभिप्राय
कोरोनातून बरे झाल्यानंतर रूग्णांनी अधिकच सजगता दाखवावयास हवी, असा अभिप्राय जगातील अनेक आरोग्य तज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोना बरा झाला तरी त्याच्या पाऊलखुणा प्रदीर्घ काळ टिकून राहू शकतात. काही रूग्णांमध्ये हा प्रभाव बरे झाल्यानंतर सहा महिन्यांर्पंतही राहू शकतो. त्यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे तज्ञांचे अभ्यासपूर्ण मत आहे.
कोरोना बरा झाल्यानंतर शरीरात प्रतिपिंडे किंवा प्रतिजैविके (अँटिबॉडीज) तयार होतात. त्यामुळे किमान सहा महिने पुन्हा कोरोना होण्याची शक्यता जवळजवळ नसते यावर बहुतेक तज्ञांचे एकमत दिसून येते. मात्र या नियमाला काही अपवादही आहेत. काही तज्ञांच्या मते ही प्रतिजैविके सहा महिन्यांपेक्षा अधिक काळदेखील कार्यरत राहू शकतात. मात्र, ही शक्यता व्यक्तीनुसार बदलते.
तरीही अतिशय सावध राहणे आणि प्रकृतीसंबंधी दक्ष राहणे आवश्यक आहे. कारण कोरोनामुळे शरीरातील अनेक महत्वाचे अवयव अशक्त झालेले असू शकतात. यात हृदय, मूत्रपिंडे, फुप्फुसे, यकृत इत्यादी अवयवांचा समावेश असू शकतो. त्यामुळे वेळोवेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रकृती सांभाळणे क्रमप्राप्त ठरते. याकडे दुर्लक्ष केल्यास दीर्घकालीन दुष्परिणाम संभवू शकतात असे आरोग्य तज्ञांनी तसेच डॉक्टरांनी आवर्जून नमूद केले आहे.
युरोप-अमेरिकेत प्रमाण जास्त
कोरोनानंतरचे शरीरावरचे दुष्परिणाम युरोप व अमेरिकेत जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. विशेषतः कडक हिंवाळय़ात शारीरिक व्याधींचे प्रमाण वाढताना दिसून येते. सर्वसाधारणतः कोरोनाचे परिणाम बरे झाल्यानंतर तीन आठवडय़ांमध्ये आटोक्यात येतात. मात्र अनेक रूग्णांना दुष्परिणाम अधिक काळ जाणवतात.
व्यायाम आणि शारिरीक हालचाल

कोरोना बरा झाल्यानंतर नियमित व्यायाम आणि शरिराची हालचाल आवश्यक आहे. मात्र, बरे झाल्यानंतरच्या लगेचच्या काळात व्यायाम करणे कष्टप्रद ठरू शकते. अशा वेळी शरिराला झेपेल तेवढाच व्यायाम करणे आवश्यक आहे. आपल्या डॉक्टरांना विचारून व्यायामाचा प्रकार, स्वरूप आणि वेळ ठरविणे आवश्यक आहे. चालण्याचा व्यायाम यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतो असे अनेक तज्ञांचे मत आहे.
सकस आहार घ्यावा

कोरोनामुळे झालेली शरीराची हानी भरून काढण्यासाठी सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार आवश्यक आहे. विविध प्रकारची फळे, पालेभाज्या, अंडी, प्रोटीनयुक्त पदार्थ इत्यादींचा समावेश आहारात अधिक प्रमाणात असणे आवश्यक आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक रूग्णांना अनपेक्षितरित्या वजन घटण्याची समस्या जाणवते.
स्मरणशक्तीला ताण द्या

कोरोनाचे विषाणू मेंदूच्या पेशींना हानी पोहचवितात असे संशोधनातून दिसून आले आहे. या हानीचे प्रमाण कमी जास्त असू शकते. या विषाणूंचा परिणाम स्मरणशक्तीवरही होतो. परिणामी, स्मरणशक्तीला ताण देणारे बौद्धिक खेळ, कोडी सोडविणे, बुद्धीबळ खेळणे इत्यादी कृती उपयुक्त ठरतात. यापैकी जे शक्य असेल ते दिवसाकाठी काही काळ डॉक्टरांशी चर्चा करून करावे, असे अनेक तज्ञांनी सुचविले आहे.
हळूहळू पूर्वपदावर या

कोरोना बरा झाल्यानंतर अतिउत्साहाच्या भरात एकदम पूर्वीप्रमाणे जीवनक्रम सुरू करू नका. त्यामुळे हानी अधिक प्रमाणात होते. त्यामुळे हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने शरिरावरचा ताण वाढविणे लाभदायक असते. आपले कार्यालयीन कामही एकदम पूर्वीप्रमाणे सुरू न करता हळूहळू वाढवत पूर्ववत करावे, असे तज्ञ म्हणतात.
शरिरातील बदलांकडे लक्ष ठेवा
कोरोना बरा झाल्यानंतर अनेक रूग्णांना काही शारीरिक लक्षणे दिसून येतात. त्यात डोकेदुखी, औदासिन्य, भूक कमी लागणे, गॅस होणे, इत्यादी लक्षणे दिसतात. त्यांकडे दुर्लक्ष करू नये. वरील लक्षणे दिसू लागताच त्वरित आपल्या डॉक्टरांशी बोलून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपाययोजना करावी. उपाययोजना त्वरित केल्यास पुढची संकटे टाळता येतात. त्यामुळे या लक्षणांवर लक्ष ठेवणे अतिआवश्यक आहे.
इतरांचे सहकार्य घ्या

कोरोनातून बरे झाल्यानंतर पुढची सुधारणा होऊ देताना इतरांचे सहकार्य आवश्यक त्या ठिकाणी घ्यावे. त्यात कमीपणा मानू नये. इतरांचे सहकार्य व साहाय्य घेतल्याने आपले परीश्रम कमी होऊन आपल्यावरील ताण कमी होऊ शकतो. विशेषतः ज्या कामांमध्ये शारिरीक परिश्रम अधिक होतात अशी कामे इतरांच्या सहकार्याने करा.









