ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना प्रतिबंधक लस बनवल्याचा जगभरातील काही देशांनी दावा केला आहे. तिथे वेगवेगळ्या टप्प्यात या लसींच्या चाचण्या सुरू आहेत. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे. जगात कुठेही कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली तरी देखील त्याच्या उत्पादन आणि वितरणासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे 2021 पर्यंत ही लस उपलब्ध होणे अशक्य आहे.
कोरोना व्हायरसवरील लसीबाबत संशोधकांना यश मिळत आहे. रशिया, चीन, अमेरिका आणि ब्रिटनसह अन्य देशांनी तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वेगवेगळ्या टप्प्यात चाचण्या सुरू आहेत. तरी 2021 पूर्वी या लसी उपलब्ध होतील, याची आशा करता येणार नाही. तयार झालेल्या लसीचे उत्पादन आणि वितरण या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यासाठी वेळ लागणार आहे.
कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यास थोडा वेळ लागला तरी चालेल. मात्र, ती लस सुरक्षित असावी. सुरक्षेच्या मानकांमध्ये कोणतीही कमतरता असू नये, असे डब्ल्यूएचओचे कार्यकारी संचालक माइक रयान यांनी म्हटले आहे.









