ऑनलाईन टीम / बारामती :
बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या ‘व्हिआयटी’ सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या कालावधीमध्ये येणारे सण, उत्सव साधेपणाने व गर्दी न करता साजरे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.