एकमेव सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णासाठी ठरले तारणहार : ते म्हणतात, मिळालेले यश सांघिक प्रयत्नांचे!
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
आज आपण भेटत आहोत, अशा दोघा देवदुतांना, ज्यांनी स्वत:चे जीव धोक्यात घालत सिंधुदुर्गातील पहिल्या आणि एकमेव कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचे प्राण वाचवले. अतिशय घाबरलेल्या स्थितीत असलेल्या व जीवाची आशा सोडून दिलेल्या या रुग्णाला औषधोपचाराबरोबरच मानसिक आधार देत त्यांनी त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढवलीच. त्याचबरोबर त्याचे मानसिक बळ वाढवत त्याची इच्छाशक्तीही वाढवली. मृत्यूच्या दाढेतून त्याला सुखरुपपणे बाहेर काढलं. जीवाची आशा सोडून दिलेला हा रुग्ण अगदी हसत-हसत सर्वांचे मनापासून आभार मानत घरी परतला. ही किमया साधणाऱया या दोन देवदुतांपैकी एक आहे सिंधुदुर्गचा सुपुत्र डॉ. नागेश उत्तमराव पवार व दुसरा आहे डॉ. विशाल रेड्डी (जळगाव). आणि या दोघांना मार्गदर्शन करणारं तिसरं नाव आहे डॉ. संजय आकेरकर (कुडाळ).
कोरोना आजारावर जगात हजारो माणसे मृत्युमुखी पडली आहेत. मी-मी म्हणणारी दादा राष्ट्रे या विषाणूपुढे हतबल ठरली आहेत. जगात अद्याप कुणालाही यावर रामबाण औषध सापडलेले नाही. त्यातल्या त्यात भारतात मात्र भारतीय डॉक्टर आपला अनुभव पणास लावत केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱया औषधांचा मोठय़ा कौशल्याने वापर करीत रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. त्यामुळे भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक चांगले आहे. विदेशात देखील भारतीय डॉक्टर आपल्या कौशल्याची कमाल दाखवत आहेत.
सिंधुदुर्गातही तेच घडले. या जिल्हय़ात सापडलेला एकमेव कोरोनाबाधित रुग्ण, त्याचे प्राण वाचविण्याचे मोठे चॅलेंज जिल्हा रुग्णालयातील फिजिशीयन डॉ. पवार व डॉ. रेड्डी यांच्यासमोर होते. या दोघा युवा डॉक्टरांची नियुक्ती पूर्णवेळ कोरोना वॉर्डसाठी करण्यात आली होती. हा आजार भीती वाढवणारा व स्वत:च्या जीवालाही धोका निर्माण करणारा होता. थोडीशी चूक देखील रुग्णाच्या व डॉक्टरांच्या जीविताच्या दृष्टीने महागात पडू शकणारी होती. परंतु, मोठय़ा हिमतीने, मोठय़ा कौशल्याने वरिष्ठ फिजिशीयन डॉक्टर संजय आकेरकर (कुडाळ) यांचे गरज लागेल तेव्हा मार्गदर्शन घेत योग्य पद्धतीने उपचार केले व त्या रुग्णाचे प्राण वाचविले. पहिल्याच प्रयत्नात या दोन्ही युवा डॉक्टरना कमालीचे यश आले. आपल्या सहकाऱयांच्या मदतीने त्यांनी हे यश प्राप्त केले. हे दोन्ही युवा डॉक्टर आता आयसोलेशन विभागात दाखल संशयित रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत.
ही एक मोठी लढाई!
स्वत:चा जीव धोक्यात घालत कोविड-19 रुग्णाचे प्राण वाचवणाऱया आणि आयसोलेशन विभागात दाखल झालेल्या शंभरच्यावर रुग्णांवर उपचार करून त्यांना कोरोनापासून दूर ठेवणारे डॉ. पवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ही एक मोठी लढाई आहे. या लढाईत लढणाऱया सर्वांनाच भीती आहे. हे एक जागतिक संकट आहे. एका छोटय़ा जिल्हय़ापुरती का होईना पण या लढाईत आपल्या देशबांधवांसाठी आघाडीवर जाऊन लढण्याची संधी मला मिळाली. या लढाईचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या लढाईच्या पहिल्या टप्प्यात आम्हाला यश प्राप्त झाले. मात्र हे यश माझे एकटय़ाचे नसून ते सांघिक प्रयत्नांचे आहे.
जबाबदारीचा न घाबरता सामना
डॉ. पवार हे (एम. डी. मेडिसिन) फिजिशीयन असून ते मालवण तालुक्यातील कांदळगावचे सुपुत्र आहेत. जिल्हा रुग्णालयातील सदनिकांमध्येच पत्नी व छोटय़ा मुलीसह ते राहतात. कोविड-19 च्या रुग्णांवर करण्यात येणाऱया उपचारांविषयी व उपचार करतेवेळी डॉक्टरांनाच निर्माण होऊ शकणाऱया धोक्याविषयी बोलताना ते म्हणाले, ज्यावेळी आमच्यावर सर्वप्रथम या कोरोना वॉर्डमधील रुग्णांची जबाबदारी सोपविण्यात आली, त्यावेळी आमच्यावर दडपण वगैरे काही आले नाही. कारण यापूर्वी आम्ही ‘सार्स’सारख्या आजारातील रुग्णांवर उपचार केले होते. तो अनुभव आमच्यापाशी होताच. परंतु, सार्सपेक्षाही कोरोनाची रॅपिड व्हायरलची क्षमता पाहून, या आजारावर उपचार करताना आपणास अनेक पटीने अधिक दक्षता घ्यावी लागणार, या विचाराने आम्ही काहीसे गंभीर झालो होतो. हा आजार फुफ्फुस, श्वसन या प्रक्रियेशी संबंधित असला, तरी तो पूर्णत: नवीन असल्यामुळे मी व माझे सहकारी डॉ. विशाल रेड्डी यांनी वरिष्ठ वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊनच तसेच जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आकेरकर यांचे मार्गदर्शन घेत उपचार सुरू केले. हे उपचार देत असताना जीवाच्या भीतीने घाबरलेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्याचीही गरज होती. ही जबाबदारी देखील आम्ही व्यवस्थित पार पाडली आणि पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरलो. अर्थातच त्या रुग्णाने दिलेली साथ व त्याची स्वत:ची रोगप्रतिकारकशक्ती नैसर्गिकरित्या मजबूत असल्यामुळे त्याचे प्राण वाचवण्याला आम्हाला सोपे गेले. या कोरोना वॉर्डमधील आयसोलेशन विभागात दाखल असलेल्या जवळपास 100 रुग्णांवर आतापर्यंत आम्ही उपचार केले आहेत, असे ते म्हणाले.
आम्हालाही घ्यावी लागतात औwषधे
खरं तर कोरोना वॉर्डमध्ये वावरणं, हे धोक्याचेच आहे. यासाठी आम्ही पीपीई किट परिधान करतोच. त्याचबरोबर आम्ही व या वॉर्डमध्ये काम करणारे आमचे सर्व सहकारी यांना जी कोरोना संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधं दिली जातात, तीच औषधं आम्हाला देखील घ्यावी लागत आहेत. कारण रुग्णांवर उपचार करताना आम्हाला कोणत्याही स्वरुपाचा धोका पत्करावा लागू नये, यासाठीची ही तरतूद असते, असे ते म्हणाले.
घरातल्या घरात ‘आयसोलेट’
आम्ही रुग्णालयात हे काम करीत असताना घरची मंडळी मात्र कायम तणावामध्ये असतात. मी शासकीय कॉटर्समध्ये राहत असलो, तरी घरात बायको आणि मुलांपासून मी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. माझ्यापासून माझ्या परिवाराला कोणत्याही स्वरुपाचा धोका पोहोचू नये, यासाठी माझा हा प्रयत्न असतो. तसेच घराकडून दररोज सकाळी आणि संध्याकाळी आईचा फोन येत असतो. ती नेहमी काळजी करीत असते. खरं तर अपेक्षा, भीती, कर्तव्य आणि जबाबदाऱयांच्या या ओझ्याने शारीरिक आणि मानसिक थकवा हा जाणवत असतो. मात्र आपण करीत असलेली हीच खरी देशसेवा असून हा खऱया अर्थाने आपल्या कसोटीचा क्षण आहे, असे मनात आणून नव्या उमेदीने कामावर जाणे होते, असे ते म्हणाले. सिंधुदुर्गात एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून देखील अजून धोका मात्र कायम असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तज्ञांच्या म्हणण्यानुसार येत्या पावसाळय़ामध्ये हा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ‘









