आमदार दीपक केसरकर यांची माहिती
वार्ताहर/ सावंतवाडी
कोरोना पार्श्वभूमीवर आमदार निधीतून 48 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून मास्क, सेनिटायझर, इमर्जन्सी औषध पुरवठा, डॉक्टर, नर्ससाठी ड्रेस पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांनी घराबाहेर पडू नका, बाजारात गर्दी करू नका. मी स्वत:ला होमक्वारंटाईन करून घेतले आहे. मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे, असे ते म्हणाले.
केसरकर मुंबईहून सावंतवाडी मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. मी मुंबईहून आल्यानंतर स्वत:ला होमक्वारंटाईन करून घेतले आहे. कुणी भेटायला येऊ नये. मी सिंधुदुर्गचा आढावा मुंबईवरून फोनद्वारे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यामार्फत घेत होतो. मतदारसंघातील लोक माझ्या दिवसरात्र संपर्कात होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अपघात झाल्याने मी घरीच!
केसरकर म्हणाले, 14 मार्चला मुंबईत घरी अपघात झाला. माझ्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे सिंधुदुर्गात येऊ शकलो नाही. आंबोली चौकुळ कबुलायतदार गावकर जमीनप्रश्नी 26 मार्चला बैठक होती. मात्र, कोरोनामुळे रद्द झाली.
गोव्यात अडकलेल्यांना महाराष्ट्राकडून मदत
केसरकर म्हणाले, गोव्यामध्ये सिंधुदुर्गातील तरुण-तरुणी अडकले आहेत. त्यांच्याबाबत मी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून विनंती करून 34 मुलांना सिंधुदुर्गात आणण्यात आले. ही मुले क्वारंटाईन आहेत. त्यांना घरी पाठवलेले नाही. 14 दिवस त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. सध्या जे गोव्यात अडकले आहेत, त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी पनवेलकर यांना समन्वयक म्हणून नियुक्त केले आहे. गोव्यात अडकले आहेत त्यांनी व पालकांनी पनवेलकर (9822321792) यांना मेसेज करावा, असे आवाहन केले. कोकणातील आंबा विक्रीसाठी पाठविण्याबाबत दिल्ली पातळीवर चर्चा सुरू आहे. आंब्यावरील संकट दूर होईल, असे केसरकर म्हणाले.
केसरकर म्हणाले, बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत व्यापाऱयांशी चर्चा केली आहे. सावंतवाडीसह जिल्हय़ातील प्रमुख शहरात एसआरपीची फौज तैनात करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांना केल्या असल्याचे ते म्हणाले.









