वार्ताहर/भिलवडी
कोरोनाच्या महामारीने सर्वत्र हाहाकार माजवला असतानाच आता भिलवडी व परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान घातले असून,आधीच आर्थिक विवंचनेत असलेले नागरिक डेंग्यू आजाराच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चाच्या ओझ्याखाली पुरते दबून चालले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला असताना, भिलवडी व परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, अनेक लोकांना डेंग्यूने घेरले आहे. अनेक कुटुंबातील जवळजवळ सर्वच सदस्यांना या आजाराने ग्रासले आहे. मार्च महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या नागरिकांना आता डेंग्यूचा उपचार करण्यासाठी येणारा खर्च न परवडण्यासारखा आहे. खाजगी दवाखान्यात येणारा खर्च हा सरासरी दहा हजार रुपयांच्यावर येत असल्याने सामान्य माणसाचे आर्थिक दृष्ट्या कंबरडेच मोडले आहे. डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनानेही योग्य त्या उपाययोजना कराव्यात, त्याचबरोबर भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डेंग्यूची तपासणी करून, डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावा असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.








