176 मतदान केंद्रांची संख्या वाढविली : शहरातील निवडणूक प्रक्रियेची दिली अधिकाऱयांनी माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून मतदान प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात 4 लाख 85 हजार 645 मतदार असून दक्षिण मतदारसंघात 268 आणि उत्तर मतदारसंघात 105 मतदान केंदे संवेदनशील आहेत. कोरोना नियमावलीमुळे दोन्ही मतदारसंघात 176 मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आल्याची माहिती साहाय्यक निवडणूक अधिकारी जगदीश के. एच. यांनी दिली.
दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात पोटनिवडणुकीबाबत प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजिली होती. यावेळी निवडणूक यंत्रणेच्या कामकाजाची माहिती दिली. एकूण दोन्ही मतदारसंघात 4 लाख 85 हजार 645 मतदार आहेत. यापैकी दक्षिण मतदारसंघात 2 लाख 43 हजार 27 आणि उत्तर मतदारसंघात 2 लाख 42 हजार 618 मतदार आहेत. एकूण 676 मतदान केंदे स्थापन करण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रभाव वाढल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 1 हजारहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रातील मतदारांची विभागणी करून नवीन मतदार केंद्र स्थापन करण्याची सूचना केली होती. त्यामुळे दक्षिण मतदारसंघात 85 आणि उत्तर मतदारसंघात 91 मतदान केंदे वाढविली आहेत. तसेच सर्व ठिकाणी एव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेद्वारे मतदान होणार आहे. याकरिता प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. काही मतदान केंद्रांची पडझड झाली असून, काही ठिकाणी नवीन इमारती बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात मतदान केंदे बदलण्यात आली आहेत.
मतदान प्रक्रियेवेळी सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच मतदान केंद्रांवर गर्दी होऊ नये याची खबरदारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याची माहिती जगदीश के. एच. यांनी दिली. तसेच कोविड नियमावलीनुसार मतदान केंद्रांवर येणाऱया प्रत्येक नागरिकाची थर्मल चाचणी करून सॅनिटायझर देण्यात येणार आहे. तसेच मतदारांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना आरोग्य खात्याकडे सुपूर्द करण्यात येईल. त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर पीपीई किटची व वेगळय़ा मतदान केंद्राची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना मतदान करण्यासाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच पीपीई किट सज्ज असे पथक कोरोनाबाधित रुग्णांचे मतदान करून घेण्यासाठी नियुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती जगदीश के. एच. यांनी दिली. विविध सभा आणि प्रचारादरम्यान कोरोना नियमावलींचे उल्लंघन करण्यात आल्याने चार ठिकाणी कारवाई करून नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गैरप्रकार टाळण्यासाठी व्हिडिओ चित्रिकरण व सेक्टर अधिकारी, व्हिजिलन्स ऑफिसर, फ्लाईंग सर्व्हाईंग टीम अशा विविध पथकांची नियुक्ती करून प्रचारादरम्यान होणाऱया गैरप्रकारावर नजर ठेवण्यात आल्याची माहिती साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांनी दिली.









