जिल्हाधिकारी कार्यालयापासून जनजागृती फेरी : खबरदारी घेण्यासह काटेकोर अंमलबजावणीस जिल्हा प्रशासनाकडून प्रारंभ

प्रतिनिधी / बेळगाव
राज्याच्या राजधानीतच कोरोनाचा कहर वाढला आहे. लॉकडाऊन आणि कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यावर शासनाने विचार चालविले आहेत. नियमांचे पालन करण्याबरोबर जनजागृती करण्यावर शासनाने भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयापासून जनजागृती फेरी काढून मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले.
कोरोना नियमावलीचे पालन करण्याकडे शहरवासियांनी दुर्लक्ष केले आहे. पण बेंगळूरमधील कोरोना बाधितांचा आकडा पाहता बेळगाव शहरातदेखील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील दोन दिवसात बेळगाव जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्यास प्रारंभ केला आहे. महापालिका प्रशासनानेही आवश्यक तयारी चालविली असून कोरोना नियमावलीचे पालन काटेकोरपणे करण्यासाठी मंगळवारपासून प्रारंभ केले आहे. मंगळवारी शहराच्या विविध भागात विनामास्क कारवाई, सामाजिक अंतर राखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. रविवारपेठ, एपीएमसी मार्केट यार्ड, खडेबाजार, गणपत गल्ली, शहापूर तसेच विविध चौकात जनजागृती मोहीम राबवून मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले. या जागृती मोहिमेवेळी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी भाग घेतला होता. याप्रसंगी सामाजिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर वेळोवेळी करा, असे आवाहन आयुक्तांनी केले. जर सामाजिक अंतर राखले नसल्यास व विनामास्क फिरताना आढळल्यास कायदेशीर कारवाई तसेच दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला.
विनामास्क कारवाईसाठी मनपा आयुक्त उतरले रस्त्यावर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सात मार्शल पथके नियुक्त करण्यात आली असून या पथकांच्या माध्यमातून मंगळवारी शहराच्या विभागात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईवेळी महापालिका आयुक्त जगदीश के.एच. स्वतः रस्त्यावर उतरले होते. याप्रसंगी मॉल, बाजारपेठ, प्रमुख मार्ग आदी ठिकाणी थांबून विनामास्क फिरणाऱयांकडून दंड वसूल करण्याची कारवाई राबविण्यात आली.
नियम पाळण्याकडे जनतेचे दुर्लक्ष
कोरोनामुळे होणारा परिणाम नागरिकांना माहीत असूनही कोरोना नियमावलींचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनजागृती मोहीम राबवून कोरोना नियमावलीअंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. जनजागृती मोहिमेअंतर्गत स्वतः जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार रस्त्यावर उतरले होते. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयापासून जनजागृती फेरी काढून जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात करण्यात आले.









