-गावातील बाधितांवर ठेवावे लागणार नियंत्रण
-गृह अलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक
कृष्णात चौगले/कोल्हापूर
जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झाला असून मृत्यूदर देखील वाढला आहे. सुमारे 60 टक्के लोक गृह अलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. पण त्यांच्यावरील संनियंत्रण खूप कमी प्रमाणात होत असल्यामुळे संशयित व्यक्ती स्वॅबचा अहवाल येईपर्यंत समाजात वावरतो. काही लोक खाजगी डॉक्टरांकडून उपचार घेतात. तर काही अंगावर काढत आहेत. परिणामी पॉझिटीव्हीटी रेट आणि मृत्यू दरात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कोरोना प्रार्दुभाव व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामदक्षता समित्या सक्रीय करून जबाबदारी निश्चित करा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना दिले आहेत.
जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी साळे यांनी सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकिय अधिक्षक यांच्यासह प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱयांना ग्रामदक्षता समित्या सक्रिय करुन त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
संस्थात्मक अलगीकरण अत्यावश्यकच
समित्यांनी बाधीत व्यक्तींना घरी विलीगीकरणासाठी परवानगी देऊ नये. यासाठी गावपातळीवरील शाळा, समाज मंदिरे, हॉल आदी ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे. याठिकाणी रुग्णांसाठी बेडसह स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करावे. किरकोळ औषधोपचार यामध्ये झिंक, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पॅरासिटामॉल आदी औषधे ठेवणे आवश्यक आहे. स्थानिक डॉक्टरांची अलगिकरण कक्षात डÎुटी लावून सकाळी व संध्याकाळी तपासणी व उपचारासाठी बोलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक आशा कर्मचारी, आरोग्य सेविका यांना `नर्सिंग केअर’साठी बोलवावे. तसेच संशयीत व्यक्ती, ज्यांच्या स्वॅब नमुना घेतला आहे, त्यांना संस्थात्मक अलगीकरण करणे आवश्यक आहे. पण संशयीत व बाधीतांना एकत्रीत ठेऊ नये. संशयीतांचा स्वॅब निगेटीव्ह आल्यावर त्यांना घरी पाठवण्याच्या प्रशासनाच्या सुचना आहेत.
मतदान केंद्रनिहाय दिली जाणार गृह भेटीची जबाबदारी
दररोज दाखल होणाऱया रुग्णांची माहिती कोव्हीड पोर्टलवर न चुकता भरणे गरजेचे आहे. गावपातळीवरील सर्व गावात असणारे शिक्षक, आरोग्य सेविका, आशा, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक यांना मतदान केंद्र निहाय भाग वाटून द्यावा. प्रत्येक दिवशी ते गृह भेट देतील.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण केवळ 12 टक्के, 30 टक्के आवश्यक
जिह्यातील कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगचे प्रमाण एकास 12 आहे. नियमानुसार एकास 30 असणे अपेक्षीत आहे. याचा अर्थ अजूनही संशयित लोकांना शोधले जात नाही. यामुळे ग्राम दक्षता समित्यांनी त्यांच्या मतदान केंद्रनिहाय, प्रभागानुसार डयुटी लावलेल्या कर्मचाऱयांकडून कॉन्टॅक्टची माहीती घ्यावी. याच दिवशी कोविड पोर्टल ऍपवर ही माहीती भरावी. असे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद आहे.
अन्यथा खाजगी डॉक्टरांच्या प्रॅक्टिसचा परवाना रद्द करा
ताप , सर्दी , पडसे , घसादुखी आदी लक्षणंच्या व्यक्ती उपचारासाठी खाजगी डॉक्टरांच्याकडे जातात. त्यांना ते उपचार करतात व घरी पाठवतात परंतु कोरोनाची लक्षणे असणाऱया रुग्णांचे स्वॅब घेणे आवश्यक आहे. सर्व खाजगी डॉक्टरांनी ग्राम समित्याना माहिती देऊन त्यांना स्वॅब तपासणीची सक्ती करणे अपेक्षित आहे. तसेच संस्थात्मक अलगीकरणासाठी खाजगी डॉक्टरांची सेवा बंधनकारक करावी. अन्यथा गावपातळीवर प्रॅक्टिस करण्याची परवानगी रद्द करावी असे प्रशासनाचे निर्देश आहेत.
पॉझिटीव्ह रुग्णांच्या सभोवतालचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित
पॉझिटीव्ह रुग्णांच्या सभोवताली आवश्यकतेनुसार व नियमानुसार प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत. तेथील सर्व्हे नियमित होतो का ? याची पाहणी करावी. 14 दिवसापर्यंत प्रतिबंध क्षेत्र करावे. 14 दिवसानंतरही प्रतिबंध क्षेत्रातून रुग्ण येत असतील तर उपाययोजना चुकत असून कडक अंमलबजावणी करण्यासाठी आदेशीत करणे आवश्यक आहे.