कोरोनाच्या तिसऱया लाटेचे अरिष्ट राज्यावर न कोसळल्यास सर्वांच्याच भल्याचं आहे. मात्र तोपर्यंत केरळमधील ओणम उत्सवानंतर एका दिवसात 31 हजाराने झालेली रुग्णवाढ आणि कोरोना काळातील सुरु असलेला जीवन संघर्ष पाहता गर्दी करणारे उत्सव साजरे करावेत कि करू नयेत एवढं शहाणपण कोरोनाचे शेपूट उरलेले असताना सुचलं तरी पुरेसे आहे….
केरळमध्ये एका दिवसाच्या रुग्णवाढीच्या संख्येने पुन्हा कोरोना वाढीबाबत शंका उपस्थित झाली आहे. केरळची आकडेवारी, आगामी सप्टेंबर महिन्यातील सण उत्सव आणि त्याला लागून संभाव्य तिसऱया लाटेचा अंदाज यातून आरोग्य यंत्रणेसाठी परीक्षेचा काळ ठरणार आहे. सामाजिक अंतर महामारीत अत्यंत महत्वाचे असल्याचे केरळमधील एका दिवसाच्या रुग्णवाढीच्या आकडेवारीने स्पष्ट केले. हे शहाणपण मागच्या वर्षीच्या कोरोना अनुभवातून येऊ नये का ? असा प्रश्न आता पडू लागला आहे. शनिवारी केरळ राज्यात ओणम उत्सव साजरा झाला. या उत्सवानंतर एकाच दिवशी 31 हजार रुग्ण आढळले. यामुळे सर्वच राज्यात सतर्कतेची घंटा वाजली. केरळपासून महाराष्ट्रपर्यंत सरळ रेषा आखल्यास 991 किमीचे अंतर होऊ शकते. तर रस्ते महामार्ग अंतराने ते अंतर सुमारे 11 हजार किमीच्या कक्षेत आहे. मात्र त्याहीपेक्षा कोरोना संसर्ग जलद गतीत असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला होता. एका दिवसात भयंकर रुग्णवाढ झालेली बाब खरी असून उत्सव आणि वाढवलेल्या कोरोना चाचण्या हे कारण असल्याचे केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. त्या मुद्यावर राज्यात आरोग्य सज्जता वाढवली असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या तिसऱया लाटेचा अंदाज सप्टेंबर महिन्यात केला आहे. या तिसऱया लाटेची सुरुवात केरळ राज्यातून तर नाही ना झाली अशी प्राथमिक शंका आरोग्य तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तो पर्यंत उत्सव साजरे करणाऱयांकडून परवानगीची जोरदार मागणी होत आहे. त्या जोडीने उत्सवांसाठी प्रवासाची मागणी देखील होत आहे. मात्र हा प्रवास विना कोरोना टेस्ट असावा अशी मागणी जोर धरत आहे. प्रवासातील आरटीपीसीआर टेस्ट सक्ती आयत्यावेळी म्हणजे आरक्षण केल्यानंतर करण्यात आली.
याला आक्षेप असल्याचा मुद्दा वगळता टेस्ट नकोच म्हणणे महामारीच्या नियमात बसत नाही. याला कारण कोरोनाच्या तिसऱया लाटेत 60 लाख नागरिक बाधित होण्याचा अंदाज केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. सर्वानाच कोरोनापासून सुटका करून लवकरात लवकर मुक्त जीवन जगण्याची घाई झाली आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणादेखील कामाला लागली असून तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी केली आहे. त्यावरून राज्यातील आगामी सणउत्सवांमधील होणाऱया संभाव्य गर्दीचा विचार करून कोरोना नियम टाळल्यास संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रवासापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट करणे, दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना टेस्ट नियम लागू न करणे, गर्दी टाळणे, मास्क वापरणे अशासारख्या त्याच त्याच नियमांचा पुनरुच्चार केला जात आहे. तर दुसरीकडे संभाव्य तिसऱया लाटेला सामोरे जाताना केलेल्या तयारीत 12 टक्के ऑक्सिजन सुविधा, 1200 डॉक्टरांच्या नेमणुका, रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी मनुष्यबळ भरण्याच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. ही सर्व तयारी फक्त तिसऱया लाटेला समोर धरून केली जात आहे असे नसून राज्याला लवकरात लवकर कोरोनामुक्त करणे हे देखील कारण आहे. त्यासाठी केंद्राकडे अधिकाधिक लसीची मागणी करण्यात येत आहे. या कारणासह दररोजचे साडेचार ते पाच हजाराच्या संख्येत नोंद होणारे कोरोना रुग्ण, डेल्टा, डेल्टा प्लसची वाढती रुग्णसंख्या, 50 ते 60 हजारात सक्रिय रुग्णसंख्या हीदेखील कारणे कोरोना विरोधातील लढय़ाच्या तयारीची आहेत. केरळमधील एका दिवसातील रुग्ण संख्येने कोरोना महामारी कोणत्याही क्षणी गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढ करू शकते असे अंदाज वैद्यकीय तज्ञ करत आहेत. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ डॉ. सौम्या नाथन यांच्या मते देशाच्या विविध भागात रुग्णसंख्या सध्या चढ उताराच्या स्थितीत आहे. अशा वेळी शरीरातील रोग प्रतिकारशक्ती आणि लसीकरण यावर संसर्ग प्रसार अवलंबून आहे. डॉ. सौम्या नाथन यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्वाचे असून आपल्या देशातील, राज्यातील किंवा राहतो त्या शहरातील लसीकरणाची टक्केवारी तपासणे आवश्यक आहे. लसीकरण झाले नसल्यास गर्दीत मिसळणे धोकादायक ठरू शकते. लस घेतल्यानंतर देखील मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. कोरोना काळात आरोग्य सांभाळणाऱया सूचनांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे सध्या पाहण्यास मिळते. कोरोना संवेदनशील जिह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर टेस्ट करणे हा नियम कोरोना रुग्णवाढ सुरु झाल्यापासून लागू करण्यात आला. कोरोना रुग्ण अधिक संख्येने, डेल्टा रुग्ण आढळणे अशी स्थिती राज्यातील काही जिह्यात अद्यापही कायम आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे कोरोनाची उबग आणि सण उत्सवांचे निमित्ताने सध्या भांडवल केले जात आहे. मागच्या वर्षी कोरोना काळात ऑक्सिजनसाठी धावाधाव करताना कोणी मदतीला आले नसल्याची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. तसेच संभाव्य तिसऱया लाटेत संसर्ग तीव्र झाल्यास आरोग्य यंत्रणा कमी पडल्यास टीकादेखील होऊ शकते. कोरोनाच्या तिसऱया लाटेचे अरिष्ट राज्यावर न कोसळल्यास सर्वांच्याच भल्याचं आहे. तूर्तास केरळमधील ओणम दरम्यानची रुग्णवाढ पाहता उत्सव साजरे करावेत कि करू नयेत याचा फेरविचार करावाच लागेल. नियमासह उत्सव साजरा करण्यास निर्बंध नाहीत. या ठिकाणी तिसऱया लाटेची कोणतीही भीती निर्माण करावयाची नसून काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना कोणत्याही धर्माचा नसून त्याला सर्व धर्म समान आहेत. महाराष्ट्रातील गणेशोत्सव गर्दीत कोरोना शिरणार नाही असेही नाही. कोरोनाचे आता शेपूट राहिले असताना गर्दीला प्रोत्साहन देणाऱयांना नियम पाळून उत्सव साजरा करण्याचे सुचले तरी तूर्तास पुरेसे आहे.
राम खांदारे








