सर्वत्र सामसूम, रस्ते निर्मनुष्य, रहदारीही तुरळक
प्रतिनिधी/ पणजी
कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या तीन दिवशीय लॉकडाऊनला शनिवारी दुसऱया दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. किरकोळ रहदारी, फार्मसी, किराणा, भाजीपाला, दूध, यासारख्या अत्यावश्यक सामानाची खुली असलेली काही दुकाने आणि लोकांची तुरळक वर्दळ वगळता अन्य सर्व व्यवहार बंद राहिले. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. रस्ते निर्मनुष्य होते. त्यामुळे लॉकडाऊन सर्वथा यशस्वी झाला. अनावश्यक फिरणारी वाहने आणि काही लोकांना पोलिसांनी कडक समज देऊन सोडले.
राज्यात गेल्या 10-12 दिवसांपासून प्रतिदिन हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित सापडू लागले होते. भरीस एप्रिलच्या एका महिन्यातच सुमारे 338 लोकांचे बळीही गेले होते. त्यामुळे सरकारला अखेर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शुक्रवारी अनेक सरकारी कार्यालये व काही खासगी आस्थापनेही चालू राहिल्यामुळे काही प्रमाणात लोकांची वर्दळ आणि वाहनांची रहदारी दिसून आली होती.
कॅसिनो परिसरातही शुकशुकाट
शनिवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोकांनी घरी राहणेच पसंत केले. गतवर्षी लागू करण्यात आलेल्या 14 दिवसांच्या लॉकडाऊनचा अनुभवही पदरी असल्यामुळे लोकांनी अत्यावश्यक सामानाची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. त्यामुळे शहरातील मार्केटमध्ये काही दुकाने उघडी असली तरी ग्राहकांविना बाजार सुनसान दिसत होता. राजधानीतील कदंब बसस्थानक शुक्रवारप्रमाणेच शनिवारीही ओस पडले होते. त्याचबरोबर मांडवी नदीत सदैव गजबजलेले असणाऱया पॅसिनोंच्या परिसरातही शुकशुकाट दिसत होता.
काहीसे असेच चित्र राज्यातील अन्य प्रमुख बसस्थानकांवरही दिसत होते. सर्व बाजारपेठा बंद राहिल्या. फोंडय़ात बुधवार आणि शनिवारी आठवडी बाजार भरतात. तेथील शनिवारचा बाजार बंद राहिला. अन्य अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये सर्व व्यवहार बंद, वाहने, माणसे कुणीच नाही, असेच चित्र होते. एकुणच राज्यात लॉकडाऊन कडकपणे पाळण्यात आला.
किनारपट्टी भागात शॅक, रेस्टॉरंटस् पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. काही हॉटेल, रेस्टॉरंटस्नी ’टेक अवे’ सेवा चालू ठेवली होती. त्यामुळे विविध निवासी हॉटेलात अडकून पडलेल्या पर्यटकांची काही प्रमाणात सोय झाली.
लॉकडाऊन कालावधी वाढविण्याची मागणी
राज्यात सध्या देशातील सर्वाधिक पॉझिटिव्हीटी रेट (51 टक्के) असून प्रत्येक दोन व्यक्तींमागे एक कोरोनाबाधित सापडत आहे. हे प्रमाण झपाटय़ाने खाली आणण्याची गरज आहे, त्यासाठी प्रभावी उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. म्हणूनच लॉकडाऊनचा कालावधी 15 मे पर्यंत वाढवावा, अशी मागणी विविध स्तरातून होऊ लागली आहे. स्वतः भारतीय वैद्यक संघटनेनेसुद्धा तशीच मागणी केली आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी तीन-चार दिवसांचा लॉकडाऊन पुरेसा नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. लोकांच्या मनात सध्या कोरोनाची दहशत आहे. कोरोना उद्रेकाने सर्व सीमा पार केल्या आहेत. त्यामुळेही बहुतेक काल शनिवारी लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्याचा परिणाम चांगला दिसून आला. पोलीस यंत्रणेनेही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सर्वत्र नाकाबंदी होती. कोरोना किंवा वाहतूक नियमांचे पालन न करणाऱया चालकांना दंड किंवा समज देऊन सोडण्यात येत होते.









