प्रतिनिधी/मिरज
तालुक्यातील बेडग येथील एका प्राथमिक शाळेचा पहिला दिवस हा संपूर्ण गावासाठी धोक्याची घंटा ठरला. या शाळेत अध्यापनाचे काम करणारा एक शिक्षक कोविड चाचणी न करताच शाळेत हजर झाला. मात्र, त्याची तपासणी केली असता तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे याच शिक्षकाला पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या एकूण 72 विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग आणि त्यांना सॅनिटायझर देण्यासाठी बसविले होते. मात्र, हा शिक्षच पॉझिटिव्ह झाल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांची झोप उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नऊ महिने शाळा बंद होत्या. 23 तारखेपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली. शाळेतील सर्वच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी प्रथम आरटीपीसीआर कोरोना चाचणी करावे, मगच शाळा सुरु करावी, असा आदेश शासनाने काढला आहे. मात्र, बेडग येथील एका प्राथमिक शाळेत काम करणारा शिक्षक कोविड तपासणी न करताच शाळेत हजर झाला. शाळेत एकूण 400 पटसंख्या आहे. त्यापैकी 72 विद्यार्थी पहील्या दिवशी शाळेत आले होते. या विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यास सदर शिक्षकाला बसविले होते. शाळेची सुट्टी झाल्यानंतर शिक्षकाला लक्षणे दिसू लागली. त्यानंतर या शिक्षकाची आरटीपीसीआर तपासणी केली असता त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
शाळेचा पहिला दिवस शाळेसाठी, पालकांसाठी आणि संपूर्ण गावासाठी धोक्याची घंटा ठरला. प्रदिर्घ सुट्टीनंतर आपल्या पाल्याला शाळेत पाठविलेल्या पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना फोन करून लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असे सांगितले आहे. सदर शाळा 14 दिवस बंद केली जाणार आहे.