केंद्र सरकारचे राज्यांना आदेश, बाधितांचा शोध घेण्यासाठी महत्त्वाच्या सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना आणि ओमिक्रॉन बाधितांमध्ये होणारी वाढ विचारात घेऊन केंद्र सरकारने सर्व राज्यांना पुन्हा एकदा सतर्क केले आहे. बाधितांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी चोवीस तास कोरोना तपासणी आणि चाचणी केंद्रे सुरू ठेवण्याचा सल्ला केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. या बूथवर कोविड-19 साठी 24 तास जलद प्रतिजन चाचणी (रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट) सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक झालेली वाढ पाहता केंद्राने राज्यांना पत्र लिहून तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्चने (आयसीएमआर) नववर्षात पुन्हा एकदा लेखी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून काही सतर्कता दर्शविणाऱया सूचना केल्या आहेत. त्यानुसार सर्व संशयित व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे. तपासाचा अहवाल येईपर्यंत, अशा लोकांनी ताबडतोब स्वतःला विलगीकरणात ठेवावे आणि आरोग्य मंत्रालयाच्या संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे केंद्रीय आरोग्य सचिव आणि आयसीएमआरच्या महासंचालकांनी पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत असून येथे पॉझिटिव्हिटीचे प्रमाणही चिंताजनक बनत असल्याचे लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्गाने होणारे मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतापासून आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. त्यानुसार दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटकसह 8 राज्यांना मृत्यू दर कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. दिल्ली आणि मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्याचवेळी गुडगाव, चेन्नई, कोलकाता, बेंगळूर आणि अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये संसर्ग वाढला आहे.
आजारी असलेल्यांनी वेळीच काळजी घ्यावी!
कोणत्याही व्यक्तीला ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, श्वास लागणे, शरीरात वेदना, चव किंवा वास कमी होणे, थकवा आणि जुलाब होत असल्यास अशा रुग्णांनी वेळीच खबरदारी घ्यायला हवी, असे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सुचविले आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका अधिक नसून सौम्य आहे असे समजू नका. लसीकरण न झालेल्या आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱयांसाठी ओमिक्रॉन जीवघेणा ठरू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रजिस्ट्रेशन सुरू, उद्यापासून डोस
कोरोना संसर्गाचा अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारतात आता अल्पवयीन मुलांचेही लसीकरण सुरू होत असून उद्यापासून म्हणजे 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारपासून नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लसीकरणासाठीची नोंदणी को-विन ऍपवर केली जात असून दहावीचे शालेय ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य मानले जात आहे. ही नोंदणी प्रक्रिया आधीच्या नोंदणीसारखीच आहे. सध्या काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसल्यामुळे शालेय आय-कार्ड पुरावा समजला जात आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांबरोबरच 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरणही पुढील आठवडय़ापासून सुरू होणार आहे.
पंतप्रधानांच्या घोषणेनंतर लसीकरणाला बळ
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या आठवडय़ात देशाला संबोधित करताना 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. हे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसेच कनिष्ठ महाविद्यालयात जाणाऱया विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले होते. तसेच आता आरोग्य कर्मचारी अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि प्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोसही देण्याची सुरुवात 10 जानेवारी, 2022 पासून करण्यात येणार आहे.









