केंद्र सरकारची राज्य सरकारांना सूचना, नियमांचे पालन करण्याचे आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अनेक राज्यांनी कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली आहे. मात्र केंद्र सरकारने त्यांना तसे न करण्याची सूचना केली असून कोरोना रुग्णसंख्या कमी दाखवून हा प्रश्न सुटणार नसल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय आरोग्य विभागाने या संबंधात एक पत्र सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागांना पाठविले आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिव आरती अहुजा यांनी हे पत्र पाठविले असून धोरणात्मक पद्धतीने चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी अशी सूचना केली. ज्या भागांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त आहे तेथे चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. सध्या देशात ओमिक्रॉन या कोरोनाच्याच नव्या रुपाचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. अशा स्थितीत चाचण्यांची संख्या कमी करुन रुग्णसंख्या कमी दाखविल्यास या विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात यश येणार नाही. उलट प्रसार अधिकच वाढेल, असा महत्वपूर्ण इशारा पत्रात देण्यात आला आहे.
चाचण्यांचे स्थान महत्वपूर्ण
कोरोनाविरुद्धच्या संघर्षात चाचण्यांचे स्थान महत्वाचे आहे. कोरोनाच्या प्रसाराचे प्रमाण चाचण्यांमधूनच लक्षात येणार आहे. विशेषतः ज्या वस्त्यांमध्ये रुग्ण अधिक प्रमाणात मिळत आहेत, तेथे रुग्णांना निरोगी व्यक्तींपासून वेगळे करण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करणे आवश्यक आहे. धोरणात्मक पद्धतीने चाचण्या करुनच कोरोनाचा प्रसार धोकादायक पातळीपर्यंत जाण्यास अटकाव करता येऊ शकतो, असे केंद्र सरकारच्या सल्लागार तज्ञांनीही स्पष्ट केले.
उपचाराधीन रुग्णसंख्येत वाढ
सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 1,38,018 ची भर पडली आहे. त्यामुळे एकंदर रुग्णसंख्या 3,76,18,271 इतकी झाली असून उपचाराधीन रुग्णसंख्या आता 17,36,628 पर्यंत पोहचली आहे. याच कालावधीत 310 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. परिणामी मृतांची एकंदर संख्या 4,86,761 पर्यंत गेली.









