लांजा-खेरवसे जाधववाडीतील प्रकार
प्रतिनिधी / लांजा
तालुक्यातील खेरवसे जाधववाडी येथील नागरिकांनी कोरोना चाचणी न केल्याने तहसीलदारांनी नागरिकांचे रास्त दराचे धान्य बंद केले आहे. अतिवृष्टीमुळे असामान्य परिस्थिती निर्माण झालेली असताना लांजा तहसीलदारांच्या रेशन धान्य बंदच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे खेरवसे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
खेरवसे गावातील नागरिकांना रेशन धान्य आणण्यासाठी 3 कि.मी. अंतरावर वाडगाव येथे जावे लागते. दोन दिवस नागरिक वाडगाव रेशन दुकानावर गेले असता त्यांना धान्य देण्यास मनाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रिकाम्या हाती नागरिकांना घरी परतावे लागले. या बाबत नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, खेरवसे जाधववाडी येथे एक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने येथील सर्व नागरिकांची चाचणी करण्यास प्रशासनाने सांगितले. मात्र नागरिकांनी 2 दिवसांचा कालावधी द्या. त्यानंतर सर्व नागरिक चर्चा करून प्रशासनाला कळवतो, असे सांगितले होते. मात्र आरोग्य पथक, पोलीस प्रशासन, तलाठी यांनी आजच चाचणी करावी लागेल, असे सांगितले. मात्र याला विरोध दर्शवित, चर्चा करून 2 दिवसात कळवू, या ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे प्रशासन माघारी परतले. त्या दिवसापासून लांजा तहसीलदार उज्ज्वला केळुसकर यांनी खेरवसे जाधववाडीच्या नागरिकांना रेशनवर धान्य न देण्याच्या सूचना केल्या.
या निर्णयामुळे पुढील 3 दिवस नागरिक रेशन दुकानावर जाणेच टाळत आहेत. यासह जाधववाडी येथील नागरिक सातबारा काढण्यासाठी गेले असता तहसील विभागातून सातबारा देण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना सर्वच बाजूने वेठीस धरण्याचा प्रकार लांजा तहसीलदारांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे खेरवसे जाधववाडीचे नागरिक त्रस्त झाले आहेत.









