प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱया कोरोना चाचण्यांचे दर एप्रिल महिन्यापासून सुधारित करण्यात आले. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱया आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये करण्यात आली. तर रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात आली. पण कोल्हापूर जिह्यातील काही प्रयोगशाळांकडून आरटीपीसीआर चाचणीसाठी एक ते दीड हजार रूपये फी आकारली जात आहे. तर अँटीजेन टेस्टसाठीही 150 रूपयांऐवजी पाचशे ते सातशे रूपये घेतले जात आहेत. त्यामुळे अशा प्रयोगशाळांवर प्रशासनाने नियंत्रण ठेवून नागरीकांची लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱया कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 500 रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक केले आहे. यापूर्वी राज्यशासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे 1200, 980 आणि 700 रुपये असे दर करण्यात आले होते. नवीन शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी 500, 600 आणि 800 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 500 रुपये आकारण्याचे निश्चित केले. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 600 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांचे निर्देश आहेत. तरीही आरटीपीसीआर चाचणीचा घरातून नमूना नेण्यासाठी जिह्यातील काही प्रयोगशाळांतून एक ते दीड हजार रूपये फी घेतली जात आहे. तर अँटीजेन टेस्टमध्येही अशीच लूट सुरु असल्याचे चित्र आहे.









