बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना चाचणीत कर्नाटक देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि चाचण्यांमध्ये चार कोटींचा आकडा पार केला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी बुधवारी दिली. दरम्यान, “कर्नाटकाने महामारीविरूद्धच्या लढाईतील आणखी एक मैलाचा दगड ठरवत ४ कोटी कोरोना चाचण्यांचा टप्पा पार केला,” असे त्यांनी ट्विट केले आहे.
ते पुढे म्हणाले, “राज्यात घेण्यात आलेल्या ८० टक्क्यांहून अधिक चाचण्या आरटी-पीसीआर चाचण्या आहेत आणि कर्नाटकाने संपूर्ण देशात तिसऱ्या क्रमांकाच्या नमुन्यांची चाचणी केली आहे.” मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात ३,३३८ स्वॅब संकलन केंद्रे आणि २५२ कोविड चाचणी प्रयोगशाळा आहेत.









