प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणुचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. राज्यासह बेळगाव शहरातही कोरोनाग्रस्त रूग्ण निदर्शनास आले आहेत. कोरोना चाचणीसाठी बेळगाव येथे प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या संदर्भात चाचणीसाठीची प्रयोगशाळा बेळगाव ऐवजी आता हुबळी येथे स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी बेळगाव, म्हैसूर, शिमोगा, बेळ्ळारी, हासन या शहरामध्ये कोरोना व्हायरस प्रयोगशाळा मंजूर झाल्याचे सांगितले होते. तसेच बेळगाव हे महाराष्ट्र-गोवा राज्याच्या सीमेवर असल्याने या ठिकाणी कोरोना व्हायरस चाचणी प्रयोग शाळा गरजेची असल्याचे म्हटले होते. त्यानंतर दि. 13 मार्च रोजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधला होता. सध्या केएलई हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरस संशयित रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे. बेळगाव जिल्हय़ात 7 पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने कोरोना व्हायरस चाचणी प्रयोगशाळा होणे गरजेचे आहे.
आरोग्यमंत्री श्रीरामूलू यांनी बेळगाव दौऱयादरम्यान शहरात प्रयोग शाळा उभारण्यासाठी अधिकाऱयांना सूचना केल्या होत्या. मात्र आता ही प्रयोगशाळा हुबळी येथे स्थापण्याचे जाहीर झाले आहे.









