अनेक गावांमध्ये कोरोना रुग्णही घटले : दुसरी लाट ओसरण्याकडेही वाटचाल
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गेल्या 15 दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होऊ लागल्याने अनेक गावांनी कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्याचबरोबर कोरोनाची दुसरी लाटही ओसरू लागली आहे. परिणामी आतापर्यंत 308 गावे कोरोनामुक्त झाली आहेत, अशी माहिती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिली.
रेड झोनमध्ये गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ाला रेड झोनमधून बाहेर काढण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या आदेशानुसार कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या. दरदिवशी पाच ते सहा हजार कोरोना चाचण्या होऊ लागल्या. संपूर्ण जून महिना दररोज चाचण्या मोठय़ा प्रमाणात वाढविल्या. त्यामुळे रुग्णसंख्येत हळूहळू घट होऊ लागली. पॉझिटिव्हीटी दरही 10 टक्क्यांच्या खाली आला. तसेच यापूर्वी सहाशेच्या पटीत दररोजचे रुग्ण आढळत होते. ते आता तीनशेच्या खाली आढळत आहेत. त्यामुळे जिल्हय़ात बरीच गावे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागली आहेत.
जिल्हय़ात कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. मात्र, रुग्णसंख्येत घट होऊ लागल्याने दुसरी लाट ओसरू लागल्याची सुचिन्हे आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे 308 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. यावरूनच जिल्हय़ात आता रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हय़ात 743 महसुली गावे असून त्यातील 308 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर 435 गावांमध्ये अजूनही कोरोना रुग्ण आहेत. मात्र, त्यातील बरीच गावे कोरोनामुक्तीच्या उंबरठय़ावर आहेत. मालवण तालुक्मयात सर्वाधिक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. मालवणमध्ये एकूण 135 गावे आहेत. त्यापैकी 72 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर 63 गावात कोरोना रुग्ण आहेत. वैभववाडी तालुक्मयातील 58 पैकी 32 गावे कोरोनामुक्त झाली असून 26 गावे शिल्लक आहेत. कणकवली तालुक्मयातील 107 पैकी 64 गावे कोरोनामुक्त झाली असून 43 गावे शिल्लक, देवगड तालुक्मयातील 95 पैकी 37 गावे कोरोनामुक्त तर 58 शिल्लक, कुडाळ तालुक्मयातील 125 गावांपैकी 40 कोरोनामुक्त तर 85 शिल्लक, वेंगुर्ले तालुक्मयातील 83 पैकी 13 कोरोनामुक्त तर 70 शिल्लक, सावंतवाडी तालुक्मयातील 72 पैकी आठ कोरोनामुक्त तर 64 शिल्लक, दोडामार्ग तालुक्मयातील 68 पैकी 42 कोरोनामुक्त तर 26 शिल्लक आहेत. 743 गावांपैकी 308 कोरोनामुक्त झाली असून उर्वरित 435 गावेही कोरोनामुक्त होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.









