डॉ. सुरेश कुडवा यांची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाकाळात दगावलेल्या डॉक्टरांना अद्याप राज्य सरकारकडून नुकसानभरपाई मिळालेली नाही. सेवा बजावलेल्या डॉक्टरांना मानधन मिळालेले नाही. यामुळे डॉक्टरांचे नुकसान होत असून लवकरात लवकर राज्य व केंद्र सरकारने नुकसानभरपाई व मानधन डॉक्टरांना द्यावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे राज्याध्यक्ष डॉ. सुरेश कुडवा यांनी आयएमए बेळगाव येथील पत्रकार परिषदेत केली.
कर्नाटक आयएमएच्यावतीने राज्यभर फिरून तेथील डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या फीमध्ये चारपटीने वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे ही फी वाढ कमी करावी, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे अद्यापही कौन्सिलिंग झाले नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून कौन्सिलिंग लवकर होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात सरकार अपयशी
राज्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात बोगस डॉक्टर होण्यास सरकारच जबाबदार आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाईच होत नसल्याने बोगस डॉक्टर फोफावले आहेत. आम्ही राज्य सरकारकडे अनेकवेळा मागणी केली असून आता तरी सरकारने या मागणीचा विचार करावा, अशी मागणी सदस्यांनी केली.
डॉक्टरांवरील हल्ले रोखा
रुग्ण उपचारादरम्यान दगावला तर याचा ठपका डॉक्टरांवर ठेवला जातो. यामुळे राज्यात बऱयाच ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. हे हल्ले रोखण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. डॉक्टरांवर हल्ला झाल्यानंतर निवेदने दिली जातात. परंतु त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेवेळी डॉ. जी. के. भट्ट, डॉ. शिवकुमार कुंभार, डॉ. लक्कोळ, आयएमए बेळगावच्या अध्यक्षा डॉ. राजेश्री अनगोळ, सेपेटरी डॉ. संतोष शिंदे, जिल्हा समन्वयक डॉ. बी. जी. हलगेकर, डॉ. बसवराज बिजलगी आदी उपस्थित होते.









