ऑनलाईन टीम / मुंबई :
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्यपालांबद्दल कोण काय बोललं हे आम्ही ऐकले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपालांना विमान नाकारण्यात आले होते. राज्यपाल आणि सरकारमध्ये संघर्ष हा महाराष्ट्रासाठी नवीन नाही. राज्यपाल हे विमानात बसले होते. त्यानंतर परवानगी देण्यात आली नाही. विमानामध्ये इंधन कसे भरले होते, नेमके त्यांना ऐनवेळेवर तिकीट कसे देण्यात आले. राज्यपालांना विमान देण्याची परवानगी ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा असते. पण मनाचा कोतेपणा दाखवणे गरजेचे होते, अशी टीका फडणवीस यांनी केली.
पुढे ते म्हणाले, आपण चौकात जसे भाषण करतो तशाच पद्धतीने राज्यपालांचे भाषण लिहिलेले होते. सरकारने हे भाषण राज्यपालांना तसेच पाठवून दिले. या भाषणात शब्दांची रत्नच होते. केवळ यमक जुळवणारी भाषा यशाचे गमक असू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
- लॉकडाऊन लावण्याची मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू
जे मनात आले ते सध्या राज्यात सुरू आहे. कोणताही मंत्री उठतो, कुठेही जातो आणि लॉकडाऊन लावून येतो. काय चालले आहे हे… लॉकाडाऊनचा पोरखेळ सुरू आहे का? असा सवाल करतानाच दहा बालकांना सॅनिटायझर पाजले गेले. दोन नर्सवर कारवाई करण्यात आली. मृताच्या टाळूवरचे लोणीही खाण्याचा प्रकार झाला, अशी टीकाही त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले, राज्यातील कोविड सेंटरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. कोविड सेंटर्स ही भ्रष्टाचाराची कुरणं झाली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
- फक्त फेसबुक लाईव्ह सुरू
सध्या सरकारमध्ये काय चालले आहे ? असे विचारले तर सध्या राज्यात फेसबुक लाईव्ह सुरू आहे. मागच्या वेळचे मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह चांगले झाले. ते आम्हाला आवडले. कारण त्यांनी पहिल्यांदाच सांगितले तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. आम्हालाही तेच सांगायचे आहे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तो ऐका, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
- तुमची जबाबदारी काहीच नाही?
मुख्यमंत्र्यांनी आधी माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी घोषणा केली. आता मीच जबाबदार अशी घोषणा केली आहे. म्हणजे सरकार हात झटकून मोकळे, तुमची जबाबदारी तुम्हीच घ्या. म्हणजे अर्धी जबाबदारी जनतेची आणि अर्धी मोदींची. तुमची जबाबदारी काहीच नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.