अंत्यसंस्कारासाठी भावबंध, नातलग दूरच: माणुसकी जपण्याची गरज
बोरगाव / सागर वाझे
पूर्वीच्या काळापासून एखादी व्यक्ती मयत झाली की त्या व्यक्तीचे कुटुंब व नातेवाईक तेरा दिवसांचा दुखवटा पाळत. महामारीच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या दिवसागणिक वाढत असताना बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाबरोबरच भाऊबंद ही चार हात दूर राहत आहेत. अशा आपत्तीच्या काळात त्या कुटुंबाच्या भावबंद व माणुसकीचे नाते जपणारी मोजकीच लोक पुढे येऊन अंत्यसंस्कार, दहावा व उत्तरकार्य असे विधी एकाच वेळी आटपत आहेत. त्यामुळे तेरा दिवसाचा दुखवटा तीन दिवसावर आल्याचे चित्र दिसत आहे.
रूढी प्रथानुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे घर व कुटुंब हे तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन, दहावा, उत्तरकार्य विधी असा तेरा दिवसाचा दुखवटा पाळला जात होता. आता शहरी भागासह ग्रामीण भागात गावोगावी कोरोनामुळे मृत्यूचा वेग सुरूच असल्यामुळे स्मशानभूमीत भडाग्नी देण्यासाठी जागा मिळत नाही जागा मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.
काही गावात १३ दिवसांचा दुखवटा पाळतात कोरोनाच्या या महामारीत प्रत्येक कुटुंबाने तीन दिवसावर दुखवटा आणल्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही त्यामुळे पाहुण्यांचा वेळ व अंत्यसंस्कार व इतर विधींना होणारी गर्दी यावरती आळा बसेल. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला एकाला लागून दुसरा तिसरे असे मृतदेहाना भडाग्नी द्यावा लागत आहे.त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे काही मोजक्याच गावांनी पुरोगामी विचारांचा वारसा जपत तीन, पाच व सात असा दुखवटा पाळण्यास सुरुवात केली आहे. आता कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात दुखवटा तीन दिवसावर आला आहे.
कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबातील सर्व विधी तिसऱ्या दिवशीच घ्यावे यासाठी त्या कुटुंबाला नाईलाजाने ग्रामपंचायतीला सांगावे लागत आहे. प्रत्येक कुटुंबाला वेळेची मर्यादा अन् बंधन घालावे लागत आहेत. कारण गर्दी टाळण्यासाठी रक्षाविसर्जन, दहावा व उत्तरक्रिया विधी त्या कुटुंबांनी जेणेकरून स्मशानभूमीच्या परिसरात अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जनासाठी आलेल्या लोकांची गर्दी होऊ नये आणि या गर्दीतून कोरोना रोगाचा संसर्ग अधिक वाढू नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे.
स्मशानभूमीतील गर्दी टाळा
प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणामुळे दररोज स्मशानभूमीत चार, दोन अंत्यसंस्कार, चार दोन रक्षाविसर्जन, दहावा अशा कार्यक्रमामुळे गर्दी होत आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्वच कुटुंबानी दक्षता घेण्याची गरज आहे.