प्रतिनिधी / वाकरे
सध्याच्या कोरोनाच्या काळात ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी काम करीत असून त्यांना १५ व्या वित्त आयोगातून प्रति महिना १००० रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली होती. या मागणीचा विचार करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन अनुदान देण्याचा आदेश दिला असून मनसेच्या मागणीला यश आले आहे.
मनसेने यापूर्वी दिलेल्या निवेदनात सध्या कोरोनाच्या काळात ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी आपापल्या गावात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लोक जनजागृती, सर्वेक्षण आणि लोकांना मदत करण्याचे काम करीत आहेत असे नमूद केले होते. हे काम ते जीव धोक्यात घालून करत आहेत. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका,मदतनीस, परिचारिका, आशा वर्कर्स,पोलीस पाटील व इतर कर्मचाऱ्यांना १५ व्या वित्त आयोगातून कोरोना संपेपर्यंत प्रतिमहिना १००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशी मागणी या निवेदनात केली होत.
या अनुदानामुळे ग्रामपंचायत कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करतील. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश द्यावेत अशी मागणी पाटील यांनी केली होती.या निवेदनाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दि.१० मे रोजी सर्व गटविकास अधिकारी यांना पत्र काढून तात्काळ कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे.









