प्रतिनिधी / वाकरे
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात शासनाच्या सेवा सुविधा मिळाव्यात अशी मागणी कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ आयटक संलग्न शाखा कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प. विभाग) अरुण जाधव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात दिलेली माहिती अशी की कोरोना आजाराने सलग दोन वर्षे धुमाकूळ घातला आहे. यामध्ये ग्रामपंचायतीचा कर्मचारी कुठेही कमी पडलेला नाही. ग्रामपंचायत कर्मचारी कोरोना काळातील सर्व कामे जोखमीने करत आहेत. पण शासनाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोरोना काळात एखादा कर्मचारी कोरोना पोजिटिव्ह सापडला तर त्याला शासकीय सुविधा बेड, इंजेक्शन,ऑक्सिजन, औषध उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी आपण शासन दरबारी आमच्या व्यथा मांडून ऑक्सिजन,बेड , औषध, वैद्यकिय सदरचा खर्च शासनाकडून अथवा ग्रामपंचायतीला देण्याबाबत आपणाकडून आदेश व्हावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.