ओरोस येथे आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
शिक्षण देणे हे प्रथम कर्तव्य असतानाही संकटावेळी कोरोना काळातही शिक्षकांनी आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून उत्कृष्ट काम केले आहे.
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचविणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. या शिक्षकांमुळेच भावी पिढी घडते. अनेक क्षेत्रात निर्माण होणारे आदर्श हे याच शिक्षकांमुळे घडत असतात, असे गौरवोद्गार जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी काढले. सिंधुदुर्गनगरी येथील जि. प. च्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळय़ात ते बोलत होते.
जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, सभापती शर्वाणी गावकर, महेंद्र चव्हाण, अंकुश जाधव, कुडाळ सभापती नूतन आईर, गटनेते रणजीत देसाई, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, जिजाऊ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आदी उपस्थित होते.
देवगड-आंबेखोल येथील बापू सोनू खरात (उपशिक्षक), कणकवली -माईण येथून प्रतीक्षा प्रसाद तावडे (पदवीधर शिक्षक), वेंगुर्ले-वजराट येथून तेजस विश्वनाथ बांदिवडेकर (उपशिक्षक), सावंतवाडी-आंबेगाव येथून नितीन नामदेव सावंत (उपशिक्षक), वैभववाडी सांगुळवाडी येथून स्नेहलता जगदीश राणे (पदवीधर शिक्षक), दोडामार्ग साटेली-भेडशी येथून दिग्विजय नागोजी फडके (उपशिक्षक), तर विशेष पुरस्कार वैभववाडी-गडमठ येथील संदीप जनार्दन शेळके (उपशिक्षक) यांना जाहीर झाला होता. त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,
प्रशस्तीपत्र व रोख रकमेने सन्मानित करण्यात आले.
शिक्षकांचे काम प्रामाणिक काम – प्रजीत नायर
निवडणूक असो किंवा शासनाचे काम, पटकन उपलब्ध होणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक आहे. कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीतही या जिल्हय़ातील शिक्षकांनी प्रामाणिक काम केले आहे, अशा शब्दात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
सभापती शर्वाणी गावकर यांनी शिक्षकांचे जिल्हय़ातील अव्वल काम, शैक्षणिक गुणवत्ता याबाबत कौतुक केले. महेंद्र चव्हाण यांनी एज्युकेशन एक्स्पोची आठवण करून देत जिल्हय़ातील शैक्षणिक चळवळीचा गौरव केला. अंकुश जाधव यांनी शिक्षक दिन आणि शिक्षणाचे महत्व विषद केले. जिजाऊ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नीलेश साबळे, आदर्श शिक्षिका स्नेहलता राणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
जि. प. अध्यक्षांमुळे आजचा सोहळा!
यंदा आदर्श शिक्षकांना 5 सप्टेंबर या शिक्षक दिनीच पुरस्कार वितरण होण्यासाठी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे अध्यक्षा सावंत यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी प्रास्ताविकात कौतुक केले. तर शिक्षक दिनी रविवार सुट्टीचा वार असतानाही या पुरस्कारांचे वितरण होतेय, ही गौरवशाली बाब असल्याचे व याचे खरे श्रेय जि. प अध्यक्षांना जात असल्याचे गटनेते रणजीत देसाई यांनी नमूद केले.
राणेंची शाबसकीची थाप स्मरणात!
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा सुरू केल्या आणि त्यावेळी माझे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले. माझ्या 37 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, राज्य, ग्रामीण शिष्यवृत्ती मिळवून देता आली. सन 2012 मध्ये शिष्यवृत्ती सत्कार सोहळय़ात राणे यांनी दिलेली शाबासकीची थाप आजही स्मरणात आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे मला शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना घडविता आले, असे मनोगत आदर्श शिक्षक तेजस बांदिवडेकर यांनी मांडले.









