कोल्हापूर / प्रतिनिधी
आर्थिक वर्ष 2020-21 मधील कोरोना महामारीच्या कालावधीतील वीज देयक भरण्यासाठी वीजग्राहकांना चालू वीज देयकासाठी 3 हप्त्याची तर याच कालावधीतील थकीत वीज देयकाची रक्कम भरण्यासाठी 12 हप्त्याची सवलत दिली जाणार आहे. तरी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. प्रभाकर निर्मळे यांनी केले आहे.
विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून बाजारातील आर्थिक संकट स्थिती व महामारीचा काळामुळे वीज देयक हप्त्याने भरण्याची सवलत मिळावी अशी मागणी महावितरणकडे करण्यात येत होती. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन महावितरणने कोरोना महामारीच्या कालावधीतील वीज देयक भरण्यासाठी वीजग्राहकांना चालू वीज देयक 3 हप्त्यात तर थकीत वीज देयक भरण्यासाठी 12 हप्त्याची सवलत देण्याची योजना सुरू केली आहे. त्यासोबतच तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी पुर्नजोडणी करीता वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी एकरकमी परतफेड योजना किंवा हप्त्यात वीज देयक भरण्याची विशेष सवलत योजना सुरू केली आहे.
वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी एकरकमी परतफेड योजना
महावितरणने तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी पुर्नजोडणी करीता वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी एकरकमी परतफेड योजना किंवा हप्त्यात वीज देयक भरण्याची विशेष सवलत योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.
वीजदेयकाच्या थकबाकीतील 50 टक्के व्याज माफी
एकरकमी परतफेड योजनेत तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना थकबाकीवरील व्याजात 50 टक्के सूट व वीजपुरवठा खंडित कालावधीतील डिमांड आकारणी माफ करण्यात येणार आहे. याकरीता ग्राहकांना 100 टक्के मूळ थकबाकी व दंडाच्या रक्कमेसह थकबाकीवरील व्याजाची 50 टक्के रक्कम भरणा करावी लागेल.
एकरकमी परतफेड वा 5 समान हप्त्यात वीज देयक थकबाकी भरण्याची विशेष सवलत
तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या थकबाकीदार ग्राहकांना एकरकमी परतफेड करता येईल किंवा 5 समान हप्त्यात वीज देयक भरण्याची विशेष सवलत योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेनुसार ग्राहकांनी मुळ थकबाकी, दंड व व्याजासह असलेली वीज देयक थकबाकीची 30 टक्के रक्कम भरणा केल्यास उर्वरीत थकबाकी चालू वीजदेयकासह 5 समान हप्त्यात भरण्याची मुभा देण्यात येणार आहे. मात्र सदर ग्राहकांना उर्वरीत हप्त्याच्या रक्कमेवर वार्षिक 12 टक्के व्याज आकारणी केली जाईल.
विहित कालमर्यादेत ग्राहकाचा अर्ज निकाली
एकरकमी परतफेड योजना किंवा हप्त्यात वीज देयक भरण्याची विशेष सवलत योजनेतील ग्राहकांचे अर्ज महावितरणच्या संबंधित विभाग व उपविभाग कार्यालयांकडून विहित कालमर्यादेत निकाली काढण्यात येणार आहेत. चालू वीज देयक प्रकरणी ग्राहकांचा अर्ज 7 दिवसाच्या आत तर तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या थकबाकीदार ग्राहकांचे अर्ज 15 दिवसाच्या कालमर्यादेत निकाली काढले जातील.
पुर्नजोडणी प्रक्रिया
तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना या योजनेत अर्ज मंजुरीनंतर वीज देयक थकबाकीची 30 टक्के रक्कम व पुर्नजोडणी शुल्क भरल्यानंतर वीजजोडणी देण्यात येईल. सहा महिने कालावधीच्या आतील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांना तांत्रिक व्यवहार्यता पडताळणी करून जुन्याच ग्राहक क्रमांकाने वीजजेाडणी दिली जाईल. मात्र सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी झालेला कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहक वीज देयक थकबाकीची 30 टक्के रक्कम भरल्यास नवीन वीज जोडणीसाठी पात्र ठरेल. तांत्रिक व्यवहार्यता पडताळणीअंती नवीन वीज जोडणी शुल्काचा भरणा केल्यानंतर ग्राहकास वीजजोडणी दिली जाईल.
कृषी ग्राहक वगळून सर्व उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील पात्र वीजग्राहकांना योजनेचा लाभ घेता येईल. वीजचोरी प्रकरणातील वीज देयकाची मागणी असणारे ग्राहक वगळता न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे, मा. न्यायालयाकडून निकाली प्रकरणातील वीज ग्राहकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेसाठी अर्ज सादर करताना ग्राहकांना थकबाकीच्या 2 टक्के रक्कम भरून 200 रूपयांच्या मुद्रांकावर विनाअट सहभागाचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांनी नजिकच्या महावितरण कार्यालयास भेट द्यावी.