लसीवरील जीएसटी कायम
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जीएसटी परिषदेच्या 44 व्या बैठकीत कोविड संबंधित औषधांवरील जीएसटी दर 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून आता 12 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. लसींवरील जीएसटी मात्र कायम राहणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि केंद्र सरकार आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. 28 मे रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत परिषदेने पीपीई किट, मास्क आणि लसींसह कोविड अत्यावश्यक वस्तूंवर करसवलत देण्यासाठी मंत्रिगटाची (जीओएम) स्थापना केली. जीओएमने 7 जून रोजी आपला अहवाल सादर केला. या बैठकीत जीओएम अहवालाचा जीएसटी कौन्सिलने विचार केला.
ब्लॅक फंगसच्या औषधांवर कोणताही कर लावला जाणार नाही. पल्स ऑक्सिमीटरवरील जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच ऑक्सिजन कंसेन्ट्रेटरवर कर कमी केला आहे. व्हेंटिलेटरवरील जीएसटीही 12 वरून 5 टक्क्यांवर आणला आहे.









