प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून तो कमी होत आहे. असे असले तरी गाफिलता उपयोगी नाही. काळजी घेणे आणि सावध राहणे तसेच सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ कॉन्फरन्स चर्चेवेळी दिली. जानेवारीनंतर कोरोनाची लस कधीही येऊ शकते. त्याचे वितरण करण्याची पूर्वतयारी कशी करणार याचा लेखी अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागीतला असून तो लवकरच पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
काल मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स चर्चेत पंतप्रधानांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, तर गृहमंत्री अमित शहा या बैठकीचे समन्वयक होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरीतील सचिवालयातून या बैठकीला उपस्थिती लावली.
लस वितरणाची सविस्तर आखणी करा
कोरोनाची लस येणार असून ती देशी आहे की विदेशी ते कळलेले नाही. तसेच ती कोणत्या तारखेला येणार त्याचीही माहिती नाही. तथापि, जानेवारीनंतर ती येण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याचे डोस कसे द्यायचे याची तयारी व सविस्तर आखणी करा, असे निर्देश मोदींनी दिल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
लसीच्या शुल्काबाबत अद्याप स्पष्टता नाही
कोरोना लसीचे दोन डोस द्यावे लागणार असून आरोग्य सेवेतील कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स व इतर कोरोना योद्धे तसेच 65 वर्षावरील वृद्ध आणि इतर आजार असलेल्यांना ते प्रथम द्यावे लागतील. त्यानंतरच ते डोस इतरांना देता येतील, असे मत डॉ. सावंत यांनी प्रकट केले. त्यासाठी शुल्क असेल किंवा नसेल याबाबत सध्या तरी स्पष्टता नाही. त्यावर अजून चर्चा चालू असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
पर्यटकांनीही मास्क वापरणे आवश्यक
गोव्यात सध्या पर्यटक मोठय़ा संख्येने येत असून त्यांच्यासाठी वेगळय़ा एसओपीची गरज नाही. तथापि, त्यांनी मास्क घालणे बंधनकारक असून सॅनिटायझर, सामाजिक अंतर यांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क न घालता अनेकजण फिरतात. म्हणून दंडाची रक्कम रु. 100 वरुन रु. 200 पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पर्यटकांची थर्मल चाचणी करुन देणार प्रवेश
पर्यटक ज्या हॉटेलात राहतात तेथे त्यांची थर्मल चाचणी करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. शिवाय विमानतळ, रेल्वे स्टेशनवर येणाऱया प्रवाशांची देखील थर्मलगनने तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
थंडीचा काळ असल्याने गोवेकरांनी सावध रहावे
आपल्या देशातील महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल व इतर राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून परदेशातील अनेक राष्ट्रांतही कोरोना वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने आता सावध राहिले पाहिजे. थंडीत कोरोना वाढण्याचा धोका आहे. गोव्यात तशी फार मोठी कडाक्याची थंडी नसते. तथापि, डिसेंबर जानेवारीत थोडीफार थंडी असल्याने जनतेने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
लक्षणे दिसताच तपासणी करुन घ्यावी
लोकांनी कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. शेवटच्या क्षणी तपासणीसाठी राहू नये व हॉस्पिटलात येऊ नये. सध्या सर्व इस्पितळात तपासणी मोफत चालू आहे. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ, सावंत यांनी केले.
नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी सरकारचे प्राधान्य
या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी हे सरकार अग्रक्रमाने प्राधान्य देते, असे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले. कोविड महामारीमुळे उत्पन्न झालेल्या बिकट परिस्थितीतून आपण जात आहोत. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने सुरूवातीपासूनच विविध उपाययोजना केल्या आहेत आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यावर विशेष भर दिला आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान निधीतून पुरविले व्हेंटिलेटर
देशातील कोविड इस्पितळांना व्हेंटिलेटर पुरविण्यासाठी आपण पंतप्रधान निधीचा वापर केला. देशातील कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्व राज्यांचा सहभाग आवश्यक आहे आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. कृतीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक त्या सूचना व माहिती देणे गरजेचे आहे. चाचण्या गतीमान करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य कर्मचाऱयांनी कोरोना रूग्णांची तपासणी योग्य पद्धतीने करावी, जेणेकरून मृत्यूदर शून्यावर येईल, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
या बैठकीला सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य सचिव उपस्थित होते. आरोग्य सचिवांनी आपल्या संबंधित राज्यांचे कोविड महामारीवरील अहवाल सादर केले. गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय, पोलीस महासंचालक मुकेशकुमार मीना, आरोग्य संचालक डॉ. जोझ डि सुझा, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय, गृहसचिव तारिक थॉमस, मुख्यमंत्र्यांचे सचिव जे. अशोककुमार, वित्त सचिव पियुष गोयल, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य सचिव अमित सतीजा या बैठकील उपस्थित होते.









