ग्राहकांना फायदा न दिल्यास कायदेशीर कारवाई
प्रतिनिधी / सांगली
जीएसटी परिषदेने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना उपचार करण्यासाठी वापरली जाणारी विविध औषधे, उपकरणे यावरील जीएसटी कराचे दर हे १४ जून २०२१ च्या अधिसूचनेनुसार कमी करण्यात आले आहेत. मेडीकल ग्रेड ऑक्सीजन, टोसीलीजुमेब, रेमडेसीवीर, कोविड-19 टेस्टिंग किट्स, हँड सॅनिटाइजर, तापमापक उपकरण, पल्स ऑक्सीमीटर, ऑक्सीजन कॉन्संट्रेटर/जनरेटर, रुग्णवाहिका आदी १८ वस्तूंवरील करकपात करण्यात आल्याने कोरोना उपचारासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. हि दर सवलत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत राहणार आहे. कोरोना उपचार करणारी रुग्णालये तर याचा फायदा घेतील, पण इतरही रुग्णालये या कर सवलतींचा फायदा घेण्यासाठी पुढे येऊ शकतात.
मात्र, हे दर कमी झाल्यानंतर त्याचा फायदा ग्राहकांना देणे, हे केंद्रीय जीएसटी कायद्यानुसार बंधनकारक आहे. राष्ट्रीय नफेखोरी प्रतिबंधक यंत्रणा यावर लक्ष ठेवून आहे. कायद्यानुसार या दर कपातीचा फायदा हा अनिवार्यपणे ग्राहकांना मिळणे आवश्यक आहे. अन्यथा अशा व्यवसायांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कर कपातीचा फायदा जर ग्राहकास दिला नाही, तर जादा घेतलेली रक्कम नफा होऊ शकते व सदर व्यक्ती दंडास पात्र होऊ शकते. ग्राहक अशी तक्रार यंत्रणेकडे करू शकतात, अशी माहिती केंद्रिय जीएसटी च्या चांगली कार्यालयाकडून देण्यात आली आहे.