‘आयसीएमआर’कडून महत्त्वपूर्ण सूचना ः स्टेरॉईड्सच्या अतिवापरामुळे ब्लॅक फंगसचा धोका संभवण्याचा इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘आयसीएमआर’ने कोरोनाच्या तिसऱया लाटेत ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचाराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये कोरोनाच्या उपचारातून अनेक औषधे काढून टाकण्यात आली आहेत. यामध्ये काही अँटीव्हायरल, प्रतिजैविक आणि मोनोक्लोनल अँटीबॉडी औषधे समाविष्ट आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वात कोरोनाच्या सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणांसाठी वेगवेगळय़ा औषधांच्या डोसचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच औषधांच्या वापराबरोबरच ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यावर काय करावे, यासंबंधी काही महत्त्वपूर्ण सल्लेही जारी केले आहेत.
डॉक्टरांच्या एका गटाने या औषधांच्या वापरासंबंधी खुले पत्र लिहिल्यानंतर आता आयसीएमआरने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले. एम्स, आयसीएमआर, कोविड-19 टास्क फोर्स आणि आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचसी) संयुक्तपणे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच स्टेरॉईड्स दिल्याने कोरोना रुग्णांना फायदा होत नसून ब्लॅक फंगससारख्या आजारांचा धोका असल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. दुसऱया लाटेदरम्यान संसर्ग झालेल्या रुग्णांना मोठय़ा प्रमाणात स्टेरॉईड्स दिल्याने ब्लॅक फंगस आजाराचे रुग्ण वाढल्याचेही आयसीएमआरने म्हटले आहे. सीटीस्कॅन आणि महागडय़ा रक्त तपासणी अत्यंत गंभीर रुग्णांची आणि जेव्हा जास्त आवश्यक असेल तेव्हाच करावी, असे निर्देश आयसीएमआरच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमधून जारी केले आहेत.
खोकला तीन आठवडय़ांवर राहिल्यास टीबी चाचणी
खोकला असणाऱया रुग्णांसाठी बुडेसोनाईड घेण्यास सूचवले आहे. आजारपणात पाच दिवस ताप आणि खोकला कायम राहिल्यास हे औषध दिले जाऊ शकते. तथापि, जर एखाद्याचा खोकला दोन-तीन आठवडय़ांपर्यंत बरा होत नसेल तर त्याने टीबी किंवा तत्सम इतर कोणत्याही आजाराची तपासणी करावी, असेदेखील सांगण्यात आले आहे.









