प्रतिनिधी/ पणजी
गोमेकॉ व इतर सरकारी रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांनी भरलेली असताना त्यात आपण एक खाट अडवून बसणे योग्य वाटले नाही. आपला भाऊ डॉक्टरी पेशात असल्याने त्याच्या सल्ल्यानुसार आपण आपल्या पत्नीसह मणिपाल रुग्णालयात दाखल झालो. तथापि, येणारा सर्व खर्च आपण आपल्या खिशातून करतोय, असे निवेदन माजी उपमुख्यमंत्री तथा मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.
जनतेने दिलेले प्रेम व त्याचबरोबर हितचिंतकांच्या व नातेवाईकांच्या आशीर्वादाने आपण कोरोना आजारातून आता बरा होत आहे. मात्र आपल्या आजारपणात आपण मणिपाल रुग्णालयात दाखल झाल्याबद्दल काही राजकीय व्यक्तींनी आपल्यावर केलेल्या टीकेबाबत आपल्याला खेद झाल्याचे सुदिन ढवळीकर यांनी दुपारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. आपला भाऊ डॉक्टर आहे. त्यांनीच आपल्याला खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. सरकारी रुग्णालये, गोमेकॉ रुग्णांनी भरलेली आहेत. आपण आपली पत्नी, शिवाय आणखी दोघेजण मिळून चार खाटांची व्यवस्था करणे म्हणजे सरकारी रुग्णालयातल्या जागा अडविणे, असे आपल्याला मनापासून वाटले व आम्ही मणिपाल रुग्णालयात दाखल झालो.
तथापि, आपण मणिपाल रुग्णालयात असताना सरकारी यंत्रणेच्या किंवा आमदार या नात्याने कोणत्याही सरकारी सुविधा घेतलेल्या नाहीत. आमचा खर्च आपण स्वतः खिशातून करीत आहे. आपल्या 21 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सरकारी यंत्रणेवर सहसा खर्चाचा भार टाकला नाही व यापुढेही टाकणार नाही. आपण इतर आमदारांना विनंती करतो की, त्यांनी खासगी रुग्णालयात भरती होताना स्वतःचा खर्च स्वतःच करावा व अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या सरकारची अडचण वाढवू नये. तसेच राज्यात जे कोरोनाचे रुग्ण आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे.









