कोरोना संदर्भात सुरुवातीला असलेली भीती, कोरोना थोपविण्यासाठी घेतलेली काळजी आता दिसत नाही. सरकारी यंत्रणा ढिली पडली आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा विसर पडत चालला आहे. कोरोना मात्र वाढत चालला आहे.
कर्नाटकात कोरोनाचा कहर काही कमी होईना. बुधवारी रात्रीपर्यंत एकूण रुग्णसंख्येने 5,40,847 चा आकडा पार केला आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत साडेपाच लाखांचा टप्पा पूर्ण होणार आहे. रोज 100 हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. बुधवारी रात्रीपर्यंत राज्यातील मृतांचा आकडा 8,266 इतका झाला आहे. राजधानी बेंगळूरसह बेळगाव, बळ्ळारी, चिक्कमंगळूर, दावणगेरे, हासन, गुलबर्गा, शिमोगा, कारवार आदी जिह्यात रुग्णसंख्या वाढती आहे. गेल्या आठवडय़ात नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य अशोक गस्ती यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर बुधवारी रात्री बेळगावचे खासदार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा मृत्यू झाला आहे. या दोन खासदारांच्या मृत्यूनंतर जनमानसातील भीती वाढत चालली आहे.
कोरोना महामारीबद्दल सुरुवातीच्या काळात जी भीती होती ती नंतर राहिली नाही. लॉकडाऊन जसजसे शिथिल होईल तसतशी भीतीही नाहीशी होत गेली. ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, ज्यांनी हे संकट प्रत्यक्षात अनुभवले आहे, ज्यांनी कोरोना बाधितांची यातना जवळून पाहिली आहे त्यांच्याच मनात याची भीती होती. बाजारपेठेतील गर्दी पाहिली की कोरोना कधीच निघून गेला आहे की काय अशी परिस्थिती पहायला मिळते. केवळ आठवडाभरात कर्नाटकातील दोन नेत्यांचा बळी गेला आहे. अनेक मंत्री, आमदार कोरोनाबाधित आहेत. कोरोना विरुद्धचा त्यांचा संघर्ष सुरूच आहे. त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा भीती वाढली आहे. नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य अशोक गस्ती यांचे पक्षासाठी आजवरचे योगदान पाहून पक्षाने त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. खासदार होण्यासाठी जे मातब्बर नेते लॉबी करीत होते त्यांना बाजूला काढून प्रामाणिक नेतृत्वाला हायकमांडने संधी दिली होती. शपथविधी आटोपून गावी आल्यानंतर परत दिल्लीला जाण्याचा योग त्यांना आला नाही. ते कोरोना महामारीचे बळी ठरले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी हे मूळचे व्यवसायिक. भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जिह्याच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर आली. त्यानंतर सलग चारवेळा ते बेळगावचे खासदार झाले. गेल्या वषी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. त्यांचा जीवन प्रवासही संघर्षमय होता. एक सज्जन राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ बेळगावच नव्हे तर संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. दोन नेत्यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करायचे काय ही चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवारी आरोग्य विभागातील वरि÷ अधिकाऱयांची बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनबद्दलचा निर्णय होणार आहे. किमान शनिवार आणि रविवारी दोन दिवस पूर्णप्रमाणात लॉकडाऊन केले तर थोडय़ा प्रमाणात तरी रुग्णसंख्या घटणार आहे, असा विचार समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा लॉकडाऊनचा सल्ला दिला आहे. 21 सप्टेंबरपासून विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या फैलावामुळे हे अधिवेशन केवळ सहा दिवस चालणार आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी याला विरोध करून अधिवेशनाची मुदत वाढविण्याची मागणी केली आहे. सध्या 30 हून अधिक आमदार व 60 हून अधिक अधिकाऱयांना कोरोनाची लागण झाल्यामुळे नियोजित मुदतीआधी अधिवेशन गुंडाळण्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी विधानसभेत सरकारचे वाभाडे काढले आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. यासंबंधी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. कारण 9 मार्च रोजी 330 रु. दराने पीपीई किट खरेदी करण्यात आले तर 29 एप्रिल रोजी 1,444 रु. या दराने खरेदी करण्यात आले आहेत, ही तफावत कशासाठी असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.
कोरोना महामारी नियंत्रणासाठी कोटय़वधींचा खर्च केला जात आहे. तरीही सरकारी इस्पितळात उपचार घेणाऱया गोर-गरीब कोरोना बाधितांच्या व्यथा काही संपल्या नाहीत. त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. कर्नाटकात ऑक्सिजनचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा भासतो आहे. खासगी इस्पितळांनी कोरोना बाधितांवर उपचार सुरू केले असले तरी तो खर्च सर्वसामान्यांना परवडत नाही आणि सरकारी इस्पितळात योग्य उपचार होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कोरोना संदर्भात सुरुवातीला असलेली भीती, कोरोना थोपविण्यासाठी घेतलेली काळजी आता दिसत नाही. सरकारी यंत्रणा ढिली पडली आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा विसर पडत चालला आहे. कोरोना मात्र वाढत चालला आहे. या काळात सर्वसामान्य आजारांवर उपचार मिळणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे जनमानसात मृत्यूचे भय वाढत चालले आहे. बेंगळूर किंवा बेळगावात गेल्या दोन ते तीन महिन्यात घडलेल्या घटना लक्षात घेता उपचारासाठी चालत इस्पितळात गेलेला माणूस परत घरी येईल, याची खात्री कमी होत चालली आहे. या मुद्दय़ावर राष्ट्रीय पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. कारण पुढचे दिवस आणखी कठीण येणार आहेत, असा इशारा तज्ञ देत आहेत. बाधितांचा व मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. लॉकडाऊन केल्यास आर्थिक चक्र कोलमडते आणि अर्थव्यवस्था मागे येते तर अनलॉक केल्यास कोरोना आपला विळखा घट्ट करतो, अशा दुहेरी कोंडीत राज्य सरकार अडकले आहे. अशावेळी प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणे हेच महत्त्वाचे आहे.
रमेश हिरेमठ