इचलकरंजीत लाल बावटा कामगार युनियनकडून ११ हजार अर्ज सादर : महिना पाच हजार अनुदानाची मागणी
प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील कामगारांना महिना पाच हजाराचा कोरोना आपत्ती निधी द्यावा, तसेच त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी. या मागणीचे सुमारे ११ हजार अर्ज लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीतून नेवून सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना दिले. या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा होती.
कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून कारखाने बंद असल्याने कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यासाठी शासनाने या सर्व कामगारांना प्रत्येकी पाच हजाराचे कोरोना आपत्ती अनुदान द्यावे. तसेच यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी. अशा मागणीचे सुमारे ११ हजार अर्ज लाल बावटा जनरल
कामगार युनियनकडे कामगारांनी भरून दिले होते. मंगळवार ९ जून रोजी हे सर्व अर्ज एका बैलगाडीत भरून मलाबादे चौकातून काँग्रेस कमिटी, प्रांत कार्यालयमार्गे नेवून ते सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष शिवगोंड खोत, भरमा कांबळे, सदा मलाबादे, दत्ता माने, विलास गायकवाड, शोभा शिंदे, पार्वती म्हेत्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








