पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना लढय़ातील कामगिरीचे कौतुक केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या कामगिरीचा गौरव केला आहे. गतवर्षी धारावी पॅटर्न फेमस झाला होता. पण दुसरी लाट आली आणि महाराष्ट्रात हलकल्लोळ माजला. बंद केलेली कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू झाली. बेड नाहीत, लस नाही, प्लाझ्मा नाही, इंजेक्शन नाही असा हलकल्लोळ माजला व माजतो आहे. अनेक सामान्यजनांना राजकारण, आरोप, प्रत्यारोप, खाणे, घोटाळे याचा वैताग आला आहे. अनेकांच्या नोकऱया गेल्या, अनेकांना नोकऱया नाहीत, गुन्हेगारी व हिंसाचार वाढतो आहे, ज्यांच्या घरची कर्ती माणसे कोरोनाने बळी घेतली तेथील अवस्था डोळय़ात पाणी आणणारी आहे. कोणाला खांदा मिळाला नाही. कुणाला ऑक्सिजन मिळाला नाही, कोण दवाखान्यात लागलेल्या आगीत होरपळून मेला, कोण कोरोना उपचारासाठी कर्जबाजारी झाला. अशा कहाण्या थरकाप उडवत आहेत. अनेकांचे स्थलांतर झाले आहे त्यातून अनेक प्रश्न उभे आहेत. शैक्षणिक वर्षाची वाट लागली आहे. परीक्षा नाही, शाळा नाही, शिक्षण नाही पुढे काय व कसे होणार याचा पत्ता नाही अशी स्थिती आहे आणि आम्ही राजकारण व मोदी बरोबर की चूक, उद्धव ठाकरे योग्य-अयोग्य, बंगाल निवडणुकीनंतर काय? व्हीलचेअरचा लिलाव व ती चेअर काका आणणार अशा चर्चांमध्ये गुंग आहोत. भरीसभर शंभर कोटीची वसुली, वाझे प्रकरण, वसुली सरकार, मराठा आरक्षण हे व असे विषय घेऊन वांझोटे राजकारण करतो आहोत. रोज त्यात भर पडते आहे. पंढरपुरात महाआघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांचा पराभव का झाला अशीही चर्चा सुरू आहे. या पराभवामागे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण कारणीभूत मानले जाते आहे. थोरल्या पवारांच्या मनात काय आहे अशी पृच्छा होते आहे. मराठा आरक्षणाचे अपयश अनेकांना जिव्हारी लागले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष बॅकफूटवर आहे. या साऱया पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केलेले महाराष्ट्राचे-उद्धव ठाकरेंचे कौतुक व सुप्रिया सुळेनी घेतलेली राज्यपाल कोश्यारी यांची भेट हा विषय चर्चेला आला आहे. खरेतर कोरोना संकटकाळात आपण या राजकारणातून व हास्यास्पद सोशल मीडियातून बाहेर पडायला हवे अन्यथा काळ आपणास माफ करणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यू थरकाप उडवणारे आहेत. कालचा दिवस बरा होता अशी रोजची स्थिती आहे. कोरोनानंतरचे जग बघायला मिळणार का आणि ते कसे असेल असे अनेक प्रश्न वाकुल्या दाखवत आहेत. नोकऱया जाणार, उद्योग बंद पडणार, अर्थव्यवस्था कोसळणार, प्रियजन गमावणार, युवकवर्ग निराश होणार, साम्राज्य विस्तारासाठी युद्धे होणार हे स्पष्ट दिसते आहे. अशावेळी वाचायचे असेल व देशाचा तिरंगा उंचवायचा असेल तर आत्मभान बाळगून हास्य कार्यक्रम व रेसिपी, मद्य आणि राजकारण त्याच्या पोस्ट यातून बाहेर पडायला हवे. पुरे झाले राजकारण नेत्यांची भक्ती आणि विरोध, पुरे झाले हात मारणे व चरणे या आणि अशा वळणावर आपण उभे आहोत. पक्ष, जात, धर्म, भाषा, राजकारण गुंडाळून ठेवून काही गोष्टी निर्धाराने व स्वतः केल्या पाहिजेत. प्रथम गोष्ट आहे नियमांचे काटेकोर व स्वयंस्फूर्तीने पालन, आपली, कुटुंबाची व मानवतेची कृतीशील काळजी. पैशाचा काटकसरीने वापर, सेवाभाव जपणूक व या संकटात मानवकल्याणाच्या संधीवर नजर हे आपणास जमणार का या प्रश्नाच्या उत्तरातच आपणा सर्वाचे भवितव्य अवलंबून आहे. उद्योगपती रतन टाटांनी याबाबतीत आदर्श घालून दिला आहे. ‘बाते कम काम ज्यादा’ हे त्यांनी करून दाखवले आहे. देश आणि देशबांधव, मानवता अडचणीत असताना कसे वागले पाहिजे याचा त्यांनी वस्तुपाठच घालून दिला आहे. बलोपासना, ज्ञानोपासना आणि कौशल्य विकास यास पर्याय नाही. उद्याच्या विश्वासाठी ती सर्वोच्च गरज आहे. वर्क फ्रॉर्म होम, ऑनलाईन सर्व व्यवहार, ई-शिक्षण, निसर्ग रक्षण हे अंगवळणी पडले पाहिजे. यात मागे राहतील ते फेकले जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभर काय चालू आहे याचीही आपण नोंद घेतली पाहिजे. कोठे लॉकडाऊनला विरोध होत आहे, कोठे स्थिती पूर्वपदाला आणून संकटात संधी शोधल्या जात आहेत. कुठे लसींचा तुटवडा आहे तर कुठे कोरोनाचे थैमान सुरू आहे. काहींच्या अर्थव्यवस्था ढासळल्या आहेत. काही त्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर आपण व आपला देश याला आपण मोजले पाहिजे.जग संकटात असताना भारत आणि भारतीय अर्थव्यवस्था संकटात येत असताना आपण काय करत होतो करणार आहोत यांचे उत्तर प्रत्येकाला द्यावे लागेल. राजकारणी एकमेकाकडे बोटे दाखवतात पण आपणास तसे करता येणार नाही. शोभणार नाही, ऑक्सिजन नाही, रक्त पुरवठा नाही, औषधे नाहीत, लस नाही, उपचारासाठी पैसे नाहीत, बेड नाहीत अशा युद्धजन्य स्थितीत आम्ही दारुची दुकाने, राजकारणातील टिंगळटवाळी आणि रेसिपी व चित्रवाणी यात गुंग राहिलो तर आपले मरण आपण ओढवून घेतो आहोत. प्रत्येकाने या संकटकाळात जबाबदारीने व स्वयंप्रेरणेने नियमांचे पालन करत कोरोना महामारीला पराभूत केले पाहिजे. इतिहासात आपली, आपल्या कामगिरीची चांगली नोंद हवी. त्यातच आपले व हिंदुस्थानचे यश सामावले आहे. राजकारण होत राहिल. पण कोरोनानंतरच्या उद्याच्या भारतासाठी आपणास जाणीवपूर्वक काही करण्याची गरज आहे आणि ती स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा काळ माफ करणार नाही. जबाबदारी, कर्तव्य, माणुसकी आणि कौशल्य यावर नजर ठेवून वाटचाल करावी लागेल. आपल्या कामगिरीला आपणच रोज तपासले पाहिजे.
Previous Articleआभासी जगातला खरा माणूस
Next Article लॉकडाऊन यशस्वीतेची जबाबदारी पालकमंत्र्यांवर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








