विक्रेत्यांची अपेक्षा : लक्ष्मी पूजनाने केली व्यवसायाची सुरुवात
भारतीय संस्कृतीमध्ये पैशाला लक्ष्मीस्वरूप मानले आहे. ती प्रसन्न असल्यास सुख-समृद्धी मिळते. कोरोनाच्या दुष्टचक्रामध्ये सापडलेल्या सर्वच उद्योग समुहांची आता लक्ष्मीने प्रसन्न व्हावे, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी शिथिल झाल्यानंतर सोमवारी नव्या उत्साहाने आपल्या उद्योगाला, व्यवसायाला, विक्री व्यवहाराला सुरुवात करणाऱया प्रत्येक दुकानदाराने दुकानाचे दार उघडून साफसफाई केली आणि सर्वप्रथम विघ्नहर्ता गणेश, धनाचे प्रतीक मानली गेलेली लक्ष्मीदेवता आणि विद्यादेवता सरस्वती यांची पूजा केली.जवळजवळ 52 दिवस घालमेलमध्ये काढलेल्या सर्व व्यावसायिकांनी सोमवारी सकाळी सुटकेचा निःश्वास टाकला आणि मोठय़ा उत्साहाने आपापली दुकाने गाठली. ग्राहक हाच राजा हीच श्रद्धा असणाऱया प्रत्येक व्यावसायिकाने, दुकानदाराने दुकान स्वच्छ करून आपल्या ग्राहकराजाची प्रतीक्षा केली. आणि ग्राहकानेसुद्धा दुकानदारांची अपेक्षा सार्थ करून, खरेदी करून त्याला मोठा दिलासा दिला.तरुण भारत टीमने विविध क्षेत्रातील व्यावसायिक-विपेते यांच्याशी संवाद साधला. तेव्हा प्रत्येकांनीच आता पुन्हा कोरोनाही नको आणि लॉकडाऊनही नको, अशीच अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या अपेक्षा त्यांच्याच शब्दात….
कोविड-19 च्या नियमांचे पालन करणे आवश्यकच
52 दिवस घरात कोंडून रहावे लागल्याने लॉकडाऊन उठल्यानंतर अपेक्षेप्रमाणे शहरात गर्दी झालीच. परंतु लॉकडाऊनचा कालावधी शिथिल झाला आहे. लॉकडाऊन पूर्णतः संपलेला नाही. तिसऱया लाटेचा धोका वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी वर्तविलेलाच आहे. कोरोनाही हद्दपार झालेला नाही. फक्त त्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे कोविड-19 च्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
बेळगावात चांगल्या प्रकारची मासळी उपलब्ध -सर्फराज बेपारी (मासळी विपेते)


मागील काही दिवसांपासून आम्हाला सकाळच्यावेळीच मासेविक्री करावी लागत होती. परंतु आता सायंकाळी 5 पर्यंत वेळ दिल्याने ग्राहकांसाठी सोयीचे ठरणार आहे. सध्या ताजे व स्टोअरेज असे दोन्ही मासे बेळगावमध्ये येत आहेत. कोकण किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मासळीची आवक कमी असली तरी बेळगावात चांगल्या प्रकारची मासळी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
भांडी खरेदीसाठी ग्राहक पुन्हा दाखल -दामिनी पवार (कार्तिका स्टील)


ऐन सीझनवेळीच लॉकडाऊन झाल्याने भांडीविक्री व्यवसायाला मोठा फटका बसला. लग्नाचा सीझन वाया गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. परंतु सोमवारपासून दुकान सुरू करण्याची परवानगी दिल्यामुळे ग्राहक खरेदीसाठी पुन्हा दाखल होवू लागले आहेत. सामाजिक अंतर राखून ग्राहकांना खरेदी करण्यास सांगण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सराफी पेढय़ा पुन्हा बहरल्या -सर्वेश पोतदार (पोतदार ज्वेलर्स)


लॉकडाऊनपूर्वी नागरिकांनी लग्नासाठीची सोन्याची ऑर्डर दिली होती. परंतु लॉकडाऊन झाल्याने आम्हाला मध्यंतरी कोणलाही दागिने देता आले नाहीत. सोमवारपासून सराफी पेढय़ा पुन्हा सुरू झाल्या असल्याने ऑर्डर दिलेले ग्राहक दुकानांमध्ये येत आहेत. यापुढे ज्यांची लग्ने आहेत त्यांच्याकडून खरेदी होत असल्याने सोन्याची दुकाने पुन्हा बहरल्याचे त्यांनी सांगितले.
लग्नसराई वाया गेल्याने कापड व्यावसायिकांचे नुकसान -राजकुमार खोडा (मंगलदीप टेक्सटाईल्स)


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून कपडय़ाची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सरकारला सहकार्य करणेही व्यवसायाइतकेच जरूरीचे होते. परंतु लग्नसराई वाया गेल्याने कापड व्यावसायिकांचे नुकसान झाले. राज्य सरकारने अनलॉक केल्याने सोमवारी खरेदीसाठी ग्राहक दाखल झाले. जूनमध्ये ज्यांची लग्ने आहेत त्यांच्याकडून लग्नबस्त्याची खरेदी होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
इस्त्री, टीव्ही, फॅनसाठी मागणी वाढली -सागर कंग्राळकर (श्री राजकुमार इलेक्ट्रॉनिक्स)


इलेक्ट्रॉनिक्स दुकाने मागील दोन महिन्यांपासून बंद आहेत. या दरम्यान नवीन साहित्य मिळेल का? असे ग्राहक विचारत होते. परंतु लॉकडाऊन असल्याने ते शक्मय नव्हते. आता दुकाने सुरू झाल्याने इस्त्राr, टीव्ही, फॅन यांची मागणी वाढली आहे. पहिलाच दिवस असल्याने अजून खरेदीचा जोश नसला तरी पुढे हळूहळू वाढ होण्याची शक्मयता त्यांनी वर्तविली.
नवीन बांधकामे सुरू नसल्याने हार्डवेअर विक्रीवर परिणाम -सचिन हंगिरगेकर (श्रीराम हार्डवेअर)


लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्रही थंडावले होते. गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकल्याने बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला. सध्या पावसाचे दिवस तसेच गुंतवणूक कमी असल्याने अद्याप नवीन बांधकामे सुरू नाहीत. याचा परिणाम हार्डवेअर विक्रीवर होत आहे. ज्यांची अर्धवट कामे झाली होती, असे ग्राहक खरेदीसाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळपासूनच दुचाकी दुरुस्तीसाठी गर्दी -मारुती देसूरकर (मेकॅनिक)


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करावे लागले, तेव्हापासून शहरातील गॅरेज बंद आहेत. वाहनांमध्ये बिघाड झाल्यास ग्राहकांचे फोन येत होते. परंतु लॉकडाऊननंतर दुकानाकडे येण्याचा सल्ला देण्यात येत होता. सोमवारपासून दुकाने सुरू करण्यात आल्याने सकाळपासूनच दुचाकी दुरुस्त करून घेण्यासाठी ग्राहक दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाईल खरेदीकडे ग्राहकांचा कल -सचिन कलवार (सचिन कम्युनिकेशन)


मागील दोन महिन्यांमध्ये अनेकांचे मोबाईल खराब झाले होते. ते दुरुस्त होत नसल्याने सोमवारी खरेदीसाठी गर्दी झाली. नागरिकांच्या मनात अजून भीती असून पुन्हा लॉकडाऊन झाल्यास मोबाईल मिळणार नसल्याने ग्राहक खरेदी करीत आहेत. मोबाईलसोबतच इतर एक्सेसरीजची मागणीही वाढल्याचे त्यांनी सांगितले.
प्लास्टिक खरेदीसाठी शेतकऱयांची गर्दी : रमेश पावले (संतोष प्लास्टिक)


लॉकडाऊनमध्ये प्लास्टिकची दुकाने बंद असल्याने प्लास्टिकविना शेतकऱयांचे बरेच नुकसान झाले. सोमवारी दुकाने सुरू झाल्यानंतर प्लास्टिक खरेदीसाठी शेतकऱयांची संख्या सर्वाधिक होती. गवतगंजीवर घालण्यासाठी लागणारे प्लास्टिक, भांगलणीसाठी लागणारे प्लास्टिक, विट भट्टीवर झाकण्यासाठी लागणारे प्लास्टिक, कारखान्यांवर तसेच घरांवर झाकण्यासाठी लागणाऱया प्लास्टिकची मागणी सोमवारी सर्वाधिक होती, असे त्यांनी सांगितले.
पंखे-इस्त्री खरेदीवर अधिक भर
महत्त्वाचे म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून अनेकांची परस्परांशी गाठभेटच झाली नव्हती. मोबाईलने ही उणीव काहीअंशी भरून काढली. तरी प्रत्यक्ष भेटीचा आनंद हा वेगळाच असतो. त्यामुळे त्याचा आनंदही नागरिकांच्या चेहऱयावर दिसून आला. प्रामुख्याने या खरेदीमध्ये पंखे आणि इस्त्री यावर अधिक भर दिसून आला. पंखे बंद झाले तरी दुरुस्त करणे शक्मय नव्हते. इस्त्री हे तर महत्त्वाचेच उपकरण, त्यामुळे या दोन उपकरणांची खरेदी अधिक प्रमाणात झाली.








