एकाचदिवसात 32 वर्षीययुवकासह 9 जणांचामृत्यू,नव्याने 385 जणरुग्ण
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोरोनाने आतापर्यंत उच्चांक गाठला असून गणेश चतुर्थीच्या पूर्वदिनी राज्यात एकूण 9 जणांनी आपले प्राण गमावले. यामध्ये 32 वर्षीय युवकापासून 70 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. याचबरोबर प्रथमच अनेक दिवसानंतर कोरोनामधून 477 जण बरे झाले तर नव्याने 385 जण सापडले.
शुक्रवार हा राज्यात कोरोनासाठी काळा दिवस ठरला. एकाच दिवशी एकूण 9 जणांनी आपले प्राण गमावले. सरकारने सायंकाळी जाहीर केलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मरण पावलेल्यांमध्ये बेतकी येथील 59 वर्षीय व्यक्तीचे मडगाव इएसआय इस्पितळात निधन झाले. याशिवाय चिंबल येथील 38 वर्षीय युवक, मडगाव येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सांगे येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे दुपारी कोविड इस्पितळात निधन झाले. या शिवाय येथील 53 वर्षीय पुरुष, नुवे येथील 45 वर्षीय पुरूष तर दोनापावला येथील 32 वर्षीय युवकाचे निधन झाले. याशिवाय 63 वर्षीय माजोर्डा येथील ज्येष्ठ नागरिकाचे गोमेकॉमध्ये निधन झाले. अशा नऊजणांपैकी दोन व्यक्तींचे निधन गुरुवारी रात्री उशिरा झाले.
दरम्यान, नव्याने 385 जण कोरोनाबाधित सापडले. 477 जणांची कोरोना इस्पितळातून बरे होऊन घरी रवानगी केली. सध्या गेल्या 24 तासात 3075 प्रकरणे तपासणीस घेतली असता त्यातील 385 पॉझिटिव्ह सापडले. दरम्यान शुक्रवारी 9 जण मरण पावल्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनाचे एकूण बळींची संख्या 135 झाली आहे. दरम्यान पणजी केंद्रात रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत 199 रुग्ण सापडले आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 13484 असून त्यातील 9740 बरे झाले तर 3809 जण सक्रिय आहेत.
एकूण 3586 नमुने तपासणीस घेतले असता 2813 अहवाल नकारात्मक आला. 388 अहवाल प्रतीक्षेत आहेत. तसेच पर्वरी 204, चिंबल 207, मडगाव 493, वास्को 336, फोंडा 235, पेडणे 155, म्हापसा 136, अशा तऱहेने संख्या वाढली आहे.









