दोन्ही जिल्हय़ांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. पावसाळय़ात तापसरीसारख्या साथींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता कोरोना रोखण्याचे मोठे आव्हान दोन्ही जिल्हय़ांसमोर आहे.
कोरोनाचे संकट देशात ओढावल्यानंतर प्रारंभीच्या काळात सुरक्षित असलेल्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ांमध्ये जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांचा ओघ वाढू लागताच दोन्ही जिल्हय़ांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. आता तर पावसाळा आला आहे. पावसाळय़ात तापसरीसारख्या साथींचा सामना करावा लागणार आहे. त्याचबरोबर वेगाने वाढत असलेल्या कोरोनामुळे समूह संक्रमणाचाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता कोरोना रोखण्याचे मोठे आव्हान दोन्ही जिल्हय़ांसमोर उभे राहिले आहे.
मार्च महिन्याच्या 21 तारखेपासून कोरोनाचे संकट देशावर आले. त्यानंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता. परंतु मुंबई-पुणेसारख्या मोठय़ा शहरामध्ये आणि काही जिल्हय़ांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे सुरक्षित होते. सिंधुदुर्गात एक, तर रत्नागिरीत पाच रुग्ण आढळले होते. ते मुंबई प्रवास करूनच आलेले होते. परंतु, तेही बरे झाल्याने दोन्ही जिल्हे कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असताना ज्या ठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट निर्माण झाला, त्या पुणे-मुंबई शहरातून हजारोंच्या संख्येने चाकरमानी येऊ लागले. सुरक्षित असणाऱया दोन्ही जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्ण वाढू लागले आणि दोन्ही जिल्हय़ांची नियंत्रणात असलेली कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हे दोन्ही जिल्हा प्रशासनाकडून हतबलता व्यक्त करण्यावरून स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्हय़ात तर कोरोनाचा कहर झाला असून आतापर्यंत 297 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. दहा जणांचा मृत्यू झाला आहे. 116 जण बरे होऊन कोरोनामुक्त झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ात 75 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू, तर आठजण कोरोनामुक्त झाले आहेत. या दोन्ही जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांचा चढता आलेख आता दिसून येत आहे. या दोन्ही जिल्हय़ातील लोक मोठय़ा प्रमाणात मुंबई व पुणे या ठिकाणी नोकरीनिमित्त आहेत. हे लोक आता आपल्या गावी परतु लागल्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच कोरोनाचा प्रभाव कोकणामध्ये वाढू लागला आहे. गावी आल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरण किंवा गृह विलगीकरण करताना ग्रामस्थ आणि चाकरमान्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडले. अनेक लोकांनी चाकरमान्यांना जिल्हय़ात येण्यासाठी पास देऊ नये, अशीही मागणी केली. परंतु कोकणातील लोक आणि मुंबई यांच्यात वेगळे नाते आहे. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना गावात येण्यापासून रोखणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन्ही जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात चाकरमानी मंडळी दाखल झाली आहेत आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आता तर कोरोना रोखण्याचे मोठे आव्हान दोन्ही जिल्हय़ांच्या प्रशासनासमोर आहे.
दोन्ही जिल्हय़ांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना गंभीर बाब म्हणजे दोन्ही जिल्हय़ात कोरोना नमुना तपासणीसाठी लॅब नाहीत. त्यामुळे कोल्हापूर किंवा मिरज या ठिकाणी कोरोना नमुना तपासणीसाठी पाठवावे लागतात. परंतु, त्याठिकाणी प्रचंड लोड असल्यामुळे कोरोना नमुना तपासणीचे अहवाल येण्यास चार-चार दिवस लागत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे अहवाल येईपर्यंत संशयित रुग्ण अन्य लोकांशी संपर्कात येऊन कोरोना समूह संक्रमणाचा धोका वाढू लागला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ात लॅब सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असल्याचे खासदार विनायक राऊत आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. परंतु, ती होण्यासाठी पालकमंत्री कशा पद्धतीने पाठपुरावा करतात, यावरच ती लॅब प्रत्यक्षात होईल की नाही हे ठरणार आहे. यापूर्वी सिंधुदुर्गात माकडतापाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर लॅब मंजूर झाली होती. 8.5 कोटीचा निधीही मंजूर झाला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत ही लॅब होऊ शकली नाही. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेता कोविडची लॅब माकडतापाच्या लॅबप्रमाणे रेंगाळत न ठेवता राजकारण बाजूला ठेवून प्रत्यक्षात लॅब होण्यासाठी राजकीय ताकद पणाला लावल्यास भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसू शकतील.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये कोविड लॅब झाल्यास त्याचा निश्चितच लोकांना फायदा होईल. परंतु, आता सुरू होणाऱया पावसाळय़ामध्ये दोन्ही जिल्हय़ात दरवर्षी ज्याप्रमाणे तापसरीच्या साथी उद्भवतात, त्याप्रमाणे साथी उद्भवल्यास त्यावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. कोरोनाची लक्षणे आणि तापाची लक्षणे ही सारखीच असल्याने पावसाळ्य़ात तापसरीची साथ उद्भवल्यास निश्चितच आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडणार आहे. प्रत्येक तापसरीची व्यक्ती कोरोना संशयित रुग्ण म्हणून पाहिली गेल्यास दोन्ही जिल्हय़ाच्या सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी तेवढय़ा सुविधा आहेत का, हा देखील मोठा प्रश्न आहे. पावसाळ्य़ामध्ये सर्दी, खोकला आणि ताप हा हमखास असतोच आणि अशा सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण हे जवळच्या सरकारी किंवा खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी जातात. परंतु, सद्यस्थिती पाहिल्यास जिल्हय़ात बहुतांशी खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे पावसाळय़ाच्या काळामध्ये तापसरीची साथ उद्भवल्यास सरकारी आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येऊ शकतो. जिल्हय़ात आजही सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर्स व अन्य कर्मचाऱयांची पदे मोठय़ा प्रमाणावर रिक्त आहेत. अशा परिस्थितीत कोरोना आणि तापसरीची साथ या दोन्हीचा सामना करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
पावसाळय़ात उद्भवणाऱया तापाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आहेच. शिवाय दोन्ही जिल्हय़ांमध्ये आतापर्यंत जे रुग्ण सापडले आहेत, त्यामध्ये बहुतांशी रुग्ण हे मुंबई प्रवास करून आलेले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. परंतु आता सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये एका नर्सलाच कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्हय़ातील काही लोकांनाही कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यामुळे कोरोना समूह संक्रमणाचा धोका आता सुरु झाला आहे. हे देखील दोन्ही जिल्हय़ांसमोर मोठे आव्हान आहे. या आव्हानांना प्रशासन कशा पद्धतीने सामोरे जाते, हे आता पहावे लागेल.
संदीप गावडे








