सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांचे आवाहन : सांगेतील 11 लोकांची चाचणी निगेटिव्ह, त्यांचे घरात विलगीकरण
प्रतिनिधी / कुडचडे
सध्या राज्यात ज्या प्रकारे कोरोनाच्या स्थितीविषयी अनधिकृत माहिती पसरविण्यात येत आहे ते चुकीचे असून कोरोनासंबंधी कोणतीही माहिती आपल्या मित्रमंडळीला किंवा नातेवाईकांना पाठविण्याच्या अगोदर ती अचूक आहे याची खातरजमा करा आणि नंतरच पुढे पाठवा. कारण याचा परिणाम आपल्याच मित्रमंडळीवर व नातेवाईकांवर होऊ शकतो, असे आवाहन सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केले.
कारण तीन दिवस अगोदर सांगे, मुगोळी येथील एक व्यक्ती वास्को येथे कामाला गेलेली असताना तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याची कल्पना मिळाल्यावर कोरोनाशी संबंधित यंत्रणांनी जबाबदारी घेत त्याला कोविड रुग्णालयात भरती केले. तसेच त्याच्या जवळच्या लोकांची आणि त्याला दररोज भेटणाऱयांची चौकशी करून 11 जणांची चाचणी घेण्यात आली. त्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असून त्या सर्वांचे घरात विलगीकरण करण्यात आले आहे. तरीही लोकांमध्ये विविध प्रकारची चर्चा सुरूच आहे. याचे कारण चुकीच्या माहितीचा होणार प्रसार हे आहे, असे गावडे म्हणाले.
ज्या लोकांना होम क्वॉरन्टाईन केले आहे त्यांची डॉक्टर व अधिकाऱयांकडून रोज भेट घेऊन विचारपूस केली जात आहे. कारण कोणत्याही व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असला, तरी कोरोना कधीही जडण्याची शक्मयता नाकारता येत नाही. त्यासाठी संशयित व्यक्तींचे विलगीकरण केले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जनतेने कोरोनासंबंधी स्वतःमध्ये भय निर्माण करू नये. कारण राज्य सरकार कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. सदर प्रयत्नांना हातभार लावताना सरकारतर्फे दिलेल्या आदेशानुसार तोंडाला मास्क बांधावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे. तसेच महत्त्वाचे काम नसताना बाजारात वा इतर ठिकाणी फिरू नये. तरच आपण सर्व मिळून कोरोनाला हरवू शकणार, असे त्यांनी सांगितले.
लवकरच जागृती मोहीम
गेल्या चार दिवसांत वास्को, सांगे तसेच अन्य भागांमध्ये सापडलेल्या कोरोना रुग्णांमुळे ग्रामीण भागांतील लोकांमध्ये खळबळ माजली आहे. त्यासाठी लवकरच सरकार व एका खासगी संस्थेतर्फे प्रत्येक तालुक्मयात कोरोनासंबंधी पूर्ण जागृती व्हावी या हेतूने मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्याचा भरपूर लाभ जनतेला होईल, अशी अपेक्षा उपजिल्हाधिकारी गावडे यांनी कुडचडे रवींद्र भवन कार्यालयात बोलताना व्यक्त केली.









