स्वतःला ठरविले निर्दोष : महामारी फैलावण्यात हात नसल्याचा ड्रगनने केला दावा
वृत्तसंस्था/ बीजिंग
कोरोना विषाणूच्या फैलावाची माहिती विलंबाने देण्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या चीनने रविवारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करत स्वतःला निर्दोष ठरविले आहे. विषाणू संसर्गाचा पहिला रुग्ण वुहानमध्ये 27 डिसेंबर रोजी आढळला होता. तर व्हायरल निमोनिया आणि मानवाकडून मानवात संसर्ग फैलावण्याबद्दल 19 जानेवारी समजले होते. त्यानंतरच संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने त्वरित कारवाई सुरू केल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे.
वुहानमध्ये मागील वर्षी कोरोना विषाणू सापडल्यावर त्याची माहिती लपविणे तसेच ती विलंबाने जाहीर करण्याचा आरोप फेटाळत चीनने एक लांबलचक स्पष्टीकरण दिले आहे. चीनने घातक आजारासंबंधी पारदर्शकतेसह माहिती न दिल्याने जगभरात व्यापक जीवितहानी आणि आर्थिक संकट निर्माण झाल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच अन्य देशांच्या नेत्यांनी केला आहे.
तज्ञांची मदत
श्वेतपत्रिकेनुसार वुहानमध्ये 27 डिसेंबर 2019 रोजी एका रुग्णालयाकडून कोरोना विषाणूची ओळख पटविल्यावर स्थानिक प्रशासनाने स्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्ञांची मदत घेतली होती. विषाणूजन्य निमोनियाचे हे रुग्ण असल्याचा निष्कर्ष तज्ञांनी काढला होता. राष्ट्रीय आरोग्य आयोगाकडून (एनएचसी) स्थापन एका उच्चस्तरीय तज्ञ पथकाने 19 जानेवारी रोजी विषाणू मानवातून मानवात पसरू शकतो याची पुष्टी दिल्याचा दावाही चीनने श्वेतपत्रिकेत केला आहे.
प्रतिबंधासाठी त्वरित कारवाई
19 जानेवारीपूर्वी हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीमध्ये फैलावू शकतो याचे पुरेसे पुरावे नव्हते, असा दावा चीनचे अग्रगण्य श्वसनरोग तज्ञ वांग गुआंगफा यांनी केला आहे. कोरोना विषाणूचा मानवातून मानवात फैलाव होत असल्याचे उमगताच त्याच्या प्रतिबंधासाठी त्वरित पावले उचलल्याचे चीनने श्वेतपत्रिकेत म्हटले
आहे.









