वुहानमधील कागदपत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेचा निष्कर्ष
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगभरात कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी चीन उत्तरदायी आहे, असा आरोप अनेक तज्ञांनी केलेला आहे. त्याला दुजोरा देणारा अहवाल सीएनएन या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेने नुकताच प्रसिद्ध केला. चीनमधील वुहान येथे सर्वप्रथम या विषाणूचा उदेक झाला होता. त्याची माहिती जगाला त्याचवेळी चीनने दिली असती तर मोठा अनर्थ टाळता आला असता. तथापि, चीनने ही माहिती हेतुपुरस्सर लपवून ठेवली, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.
वुहान येथे सापडलेल्या कागदपत्रांवरूनच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ही कागदपत्रे ‘वुहान फाईल्स’ म्हणून ओळखली जातात. वुहान येथील कोरोना पिडीतांची खरी आकडेवारी चीनने लपविली. 10 फेब्रुवारी 2019 या दिवशी वुहान येथे या विषाणूचा मोठा उदेक पहावयास मिळाला होता. त्याएकाच दिवशी या शहरातील 5 हजार 918 लोक आजारी पडले होते. तथापि, चीनने ही संख्या निम्म्याहूनही अधिक कमी करून सांगितली होती. त्यामुळे जग बेसावध राहिले. परिणामी, जगभरात त्याचा झपाटय़ाने प्रसार होऊन लक्षावधी लोकांचे प्राण गेले.
नवा पुरावा
धोकादायक कोरोनाची माहिती चीनने हेतुपूरस्सर दडविली, असा नवा पुरावा या वुहान फाईल्समधून समोर आला आहे. त्यामुळे चीन अधिकच एकाकी पडण्याची शक्यता आहे. तसेच या देशावर कठोर कारवाई केली जाण्याची मागणी आता जगभरात अधिकच जोरदारपणे करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
आतापर्यंतचा तपास पक्षपाती…
संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक आरोग्य संघटना ‘हू’नेही कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी तपास चालविला आहे. पण हू ही संघटना चीनच्या मुठीत असल्याचे मानले जाते. त्यामुळे या संघटनेने मुद्दामच तपास रेंगाळत ठेवला आहे. चीनला क्लिनचीट देण्याच्या अंतस्थ उद्देशानेच हा तपास करण्यात येत आहे, असा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर वुहान फाईल्समधील नवा पुरावा महत्वाचा मानण्यात येत आहे. आता जग कोणती भूमिका घेते याकडे बारकाईने पाहिले जात आहे.









