सध्याच्या भयावहय़ कोरोना उद्रेकाच्या काळात अनेक सामाजिक संस्था व त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. तथापि, यापैकी काही संस्थांना त्यांच्या सांस्कृतीक विचारसरणीमुळे वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांकडून प्रसिद्धी दिली जात नाही. सध्याच्या आवाहनात्मक काळातही अशा तऱहेचा पक्षपात केला जाताना दिसतो.
सेवा भारती ही राष्ट्रीय स्वयंसेवक प्रेरित संस्था कोरोना विरुद्धच्या संघर्षात मोठय़ा प्रमाणावर कार्यरत आहे. तथापि, या संस्थेच्या कार्याला म्हणावी तशी प्रसिद्धी आणि महत्त्व मीडियाकडून दिले जात नाही. तरीही या संस्थेचे कार्यकर्ते कोरोनाग्रस्तांना वाचविण्यासाठी प्राणपणाने झुंजत आहेत. दिल्लीमध्ये सेवा भारतीने मोठय़ा प्रमाणावर कार्य सुरू केले असून इतर समविचारी सावर्जनिक संस्थांच्या साहाय्याने कोरोना रुग्णांसाठी 450 बेड्स ऑक्सिजनच्या सोयीसह उपलब्ध केल्या आहेत. अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना ऑक्सिजनच्या पुरवठय़ाची सोयही ही संस्था शक्य तितक्या प्रमाणात करीत आहे. रुग्णांचा आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्या मनातून मृत्यूची भीती दूर करणे आणि जगण्यावरची त्यांची श्रद्धा संवर्धित करणे अशी कामेही या संस्थेकडून गेले वर्षभर अविरतपणे केली जात आहे.
अशोक विहार येथील या संस्थेचे 100 बेड्सचे केंद्र कोरोना उपचारांसाठी आदर्श असल्याची प्रशंसा अनेक मान्यवरांनी केली आहे. सध्या महाविद्यालये बंद असल्यामुळे त्यांच्या वर्गांचे कोरोना उपचार केंद्रामध्ये रुपांतर या संस्थेने केले. आणि तेथे ऑक्झिमिटर उपलब्ध औषधे, ग्लुकोझ, इन्सुलिन, ऑक्सिजन इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोरोना चाचणीचीही व्यवस्था करण्यात आली असून प्रतिदिन 100 हून अधिक चाचण्या केल्या जातात.