गोव्यात येणाऱया प्रत्येकाची थर्मल स्कॅन चाचणी : तीन परप्रांतीय वगळता सर्व कोरोनाबाधित गोमंतकीय
- आतापर्यंत 332194 चाचण्या
- 359 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह
- 67 रुग्ण कोरोनामुक्त
- 292 रुग्णांवर उपचार सुरू
- 108 विदेशातून आलेले गोमंतकीय खलाशी बाधित
- 194 रुग्ण एकटय़ा मांगोरहिलमध्ये
- 57 रुग्ण मांगोरहिलशी संबंधित
- 19 रुग्ण आरोग्य कर्मचारी
- 11 रुग्ण आरोग्य कर्मचाऱयांचे कुटुंबीय
- 4 रुग्ण कदंब कर्मचारी
- 4 रुग्ण पोस्ट कर्मचारी
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आता राज्य सरकारने आज गुरुवार 11 जूनपासून नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. बाहेरून गोव्यात येणाऱया प्रत्येक व्यक्तीची आता थर्मल स्कॅनद्वारे चाचणी केली जाणार आहे. रेल्वे, विमान आणि रस्ता वाहतुकीद्वारे प्रवेश करणाऱया प्रत्येक व्यक्तीची ‘एन्ट्री पॉईंट’वर थर्मल स्कॅनद्वारे चाचणी होणार आहे. बाहेरून येणाऱया व्यक्तीला 14 दिवस होम क्वारंटाईनचा पर्याय असेल. नपेक्षा 2000 रुपये भरून चाचणी करावी लागेल व अहवाल येईपर्यंत दोन दिवस ‘पेड इन्स्टिटय़ुशनल’ क्वारंटाईन व्हावे लागेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) मार्गदर्शक तत्वांबात निर्णय घेण्यात आला. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. गोव्याबाहेरून येणारे स्थानिक लोकांमध्ये मिसळण्याची भीती असल्याने नवीन एसओपी तयार करण्यात आला आहे. स्वॅब घेऊन चाचणीसाठी पाठविले जायचे. दोन दिवसांनंतर अहवाल यायचा. या दोन दिवसात हे लोक इतरांमध्ये मिसळायचे. आता यानंतर हा प्रकार होणार नाही.
गोव्यात प्रवेश करणाऱयांना तीन पर्याय
आजपासून रेल्वे, विमान किंवा रस्ता वाहतुकीद्वारे येणाऱयांपैकी जे आयसीएमआर मान्यताप्राप्त लॅबचे कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट घेऊन येतील त्यांना गोव्यात थेट प्रवेश दिला जाणार आहे, मात्र हे सर्टिफिकेट 48 तास आगोदरचे असावे. नपेक्षा दुसरा पर्याय म्हणजे प्रवाशांनी चाचणी करून पेड क्वारंटाईनमध्ये रहावे. चाचणी अहवाल येईपर्यंत दोन दिवस त्यांनी तेथे थांबावे. तिसरा पर्याय म्हणजे त्यांनी 14 दिवस विलगीकरणत रहावे. त्यांच्या हातावर शिक्का लावला जाईल. तसेच घरातील मंडळींनाही घरी क्वारंटाईन व्हावे लागेल. घरी क्वारंटाईनसाठी सुविधा नसेल तर त्यांनी पेड क्वारंटाईनमध्ये रहावे. जे घरी क्वारंटाईन होतात त्यांच्या घरावर पत्रक लावले जाणार आहे. स्थानिक सरपंच, पंचसदस्य, पंचायत सचिव, नगरसेवक, मुख्याधिकारी व पोलीस यांची या घरावर व लोकांवर नजर असणार आहे.
20 टक्के गरजू प्रवाशांची मोफत तपासणी
सरकार सर्वांकडून पैसे आकारते असे नाही. गरजू आहेत अशा लोकांची सरकारने मोफत चाचणी केली आहे. साधारणपणे 20 टक्के प्रवाशांची मोफत चाचणी झालेली आहे. मांगोरहिल वास्को येथे ज्या पद्धतीने धान्य फेकून देण्यात आले ते पाहता योग्य वाटत नाही. सोसायटीमधून दिले जाणारे धान्यच पुरविले होते. प्रत्येकी 5 किला तांदूळ व 1 किलो डाळ दिली होती. काही लोक राजकारण करीत आहेत. त्यांना राजकारण करू द्या. आम्हाला लोकांची काळजी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पुढील आठवडय़ात 150 रुग्ण बरे होतील
सध्या कोरोना पॉझिटिव्ह 292 रुग्ण आहेत. यापैकी 150 रुग्ण पुढील आठवडय़ापर्यंत कोरोनामुक्त होतील. साधारणपणे सात ते दहा दिवसात रुग्ण बरे होतात. आतापर्यंत एकाही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याची गरज पडली नाही. आतापर्यंत 359 रुग्ण पॉझिटिव्ह झाले होते. त्यापैकी 67 कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 332194 लोकांच्या चाचण्या केलेल्या आहेत. सरासरी पाहिल्यास गोव्यातील चाचण्यांचे प्रमाण लोकासंख्येच्या मानाने देशात सर्वांधिक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मांगोरहिलमध्ये 194 कोरोना पॉझिटिव्ह
एकूण 292 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 194 रुग्ण हे मांगोरहिलचे आहेत, तर 57 रुग्ण हे मांगोरहिलशी संबंध असलेले आहेत. दोन वाहनचालक व अन्य एक वगळता सर्व कोरोनाबाधित हे गोमंतकीय आहे. सत्तरी, आडपाई, सांगे, बायणा, काणकोण या भागात जे कोरोना पॉझिटिव्ह सापडले ते मांगोरहिलशी संबंधित आहेत. यापैकी 19 रुग्ण हे आरोग्य कर्मचारी आहेत, तर 11 रुग्ण हे आरोग्य कर्मचाऱयांचे कुटुंबीय आहेत. 4 कदंब कर्मचारी आहेत. 4 पोस्ट खात्याचे कर्मचारी आहेत. 108 गोमंतकीय जे विदेशातून आलेले तसेच खलाशी होते. त्यांना बाधा झाली आहे.
सर्व कर्मचाऱयांची राहण्याची सोय करणार
ज्या आरोग्य कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली त्यांनी ती सेवा करताना झाली. खरे म्हणजे त्यांचा अभिमान बाळगण्याची गरज आहे. यानंतर या सर्व कर्मचाऱयांची राहण्याची सोय केली जाईल जेणेकरून त्यांना घरी जावे लागणार नाही व घरच्या लोकांशी त्यांचा संपर्क येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
वेर्णा येथे 220 खाटांचे कोरोना केअर सेंटर
वेर्णा येथे नवीन 220 खाटांचे कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद यांनी सांगितले. सी स्कॅन मेरिटाईम अकादमी हॉटेलमध्ये हे सेंटर स्थापन होणार आहे. कोरोना सदृष्य पॉझिटिव्ह रुग्णांना या सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. हल्लीच सरकारने शिरोडा येथे कोविड केअर सेंटर स्थापन केले आहे. तेथे 250 खाटांची सोय आहे, तर मडगाव कोविड इस्पितळात 220 खाटांची सोय केली आहे.









