ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना विषाणूंमुळे होणारे अपाय, त्याकरीता प्रतिबंधात्मक उपचार कसे करावे, याविषयी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरामध्ये फलक आणि पत्रकांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. मंदिरामध्ये दररोज येणा-या भाविकांमध्ये याविषयी जागृती व्हावी, तसेच सॅनिटायझर व प्रतिबंधात्मक गोष्टींचा वापर करावा, यासाठी मंदिरामध्ये विनामूल्य सेवा देण्यात येत आहे. बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे करोनाविषयी जनजागृती करण्यासोबतच सॅनिटायझर व प्रतिबंधात्मक गोष्टींचे वाटप देखील मंदिरामध्ये करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना बळीवंत, ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बी.एम.गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त चंद्रशेखर हलवाई आदी उपस्थित होते.डॉ.कल्पना बळीवंत म्हणाल्या, दत्तमंदिरातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये करोनाविषयक जनजागृतीकरीता मंदिराने पुढाकार घेणे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. मंदिरामध्ये दररोज येणा-या भाविकांमध्ये याबाबत जागृती करणे सहज शक्य होणार आहे.