कोरोना संसर्गाचा धोका वाढल्याने आता भारतीय सैन्य देखील दक्ष झाले आहे. कोरोनाविरोधी युद्धात भूमिका बजावण्यासाठी वैद्यकीय सामग्रीची वाहतूक करण्यासाठी वायुदलाच्या विमानांचा ताफा सज्ज आहे. तर युद्धनौका कुठल्याही स्थितीत तैनात होण्यासाठी अलर्टवर आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी कोरोनाशी संबंधित संरक्षण दलांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. सैन्याचे 8500 डॉक्टर्स कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.
नागरी प्रशासनाला सर्वप्रकारची मदत करण्याचा आदेश संरक्षण मंत्र्यांनी दिला आहे. सैन्याचे 8500 डॉक्टर्स आणि सहाय्यक कर्मचारीवर्गही कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला मदत करणार आहेत. सैन्याने निवृत्त आरोग्य कर्मचाऱयांना मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. तसेच एनसीसीच्या 25 हजार कॅडेट्सना नागरी प्रशासनाच्या मदतीसाठी तयार केले जात आहे.
विलगीकरण कक्ष
सुरक्षा दलांनी कोरोनाविरोधात विलगीकरण सुविधांची तयारी चालविली आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील शासकीय कंपन्यांनी आवश्यक वैद्यकीय उपकरणांची निर्मिती चालविली आहे. वायुदलाला जम्मू-काश्मीर, लडाख, मणिपूर आणि नागालँडमध्ये वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
वाहतूक विमानांचा ताफा सक्रीय
वायुदलाच्या विमानांनी मागील 3 दिवसांमध्ये 25 टन सामग्री विविध ठिकाणी पोहोचविली आहे. देशभरातील मागणी पूर्ण करण्यासाठी वायुदलाने विमानांच्या ताफ्याला सज्ज ठेवले आहे. सी-17 हेवीलिफ्टर, एएन-32 विमान आणि सी-130जे विमानाला प्रशासनाच्या मागणीनुसार सक्रीय केले जात आहे.
वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा
वायुदल आणि नौदलाचे छोटे डॉर्नियर विमानही पुरवठय़ाकरता वापरले जात आहे. दोन्ही संरक्षण दलांकडून चाचणीचे नमुने तत्काळ योग्य ठिकाणी पोहोचविले जात आहेत. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्यूपमेंट (पीपीई), हँड सॅनिटायर्स, सर्जिकल ग्लोव्ह्ज, थर्मल स्कॅनर आणि वैद्यकीय कर्मचाऱयांना एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी पोहोचविले जात असल्याची माहिती वायुदलाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
युद्धासाठी सैन्य सज्ज
किनारी भागांमध्ये गरज भासल्यास मोठय़ा प्रमाणावर सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी युद्धनौकांचा वापर होणार आहे. दोन युद्धनौका यापूर्वीच शेजारी देशांच्या मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास अन्य युद्धनौकाही उपलब्ध केल्या जाऊ शकतात. आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिस लवकरच नेपाळला वैद्यकीय मदत पुरविणार आहे.









