नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगभरात थयथयाट घालणाऱया कोरोना विषाणूने समस्त मानवजातीच्या अस्तित्त्वाला आव्हान दिले आहे. हे आव्हान रविवारी भारतीयांनी खऱया अर्थाने स्वीकारले. कोरोना विषाणू विरोधातील युद्धासाठी सारा देश एकवटला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार 14 तासांसाठी स्तब्ध झाले होते. कोरोनाने दिलेल्या आव्हानाला हे सडेतोड उत्तर ठरले. हे युद्ध जिंकणारच असा निर्धार करत देशाच्या इतिहासातील पहिल्या जनता कर्फ्यूला देशवासियांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. तसेच आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी ‘लॉकडाऊन’ घोषित करून लोकांना अधिकच सतर्क केले आहे.
जगभरातील जवळपास 200 देशांमध्ये कोरोना विषाणू पोहोचल्यानंतर सगळय़ाच देशांच्या चिंता वाढल्या आहेत. याचा परिणाम आता भारतावरही पाहायला मिळत आहे. देशातील परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानुसार रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत लोकांनी घरातच राहण्याचे पसंद केले. दिल्ली, मुंबई, कोलकाता, नोएडा, लखनौ, बेंगळूरसारख्या मोठय़ा शहरात पूर्णपणे शुकशुकाटाची परिस्थिती दिसून येत होती. अनेक ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती. गर्दीच्या ठिकाणांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. बस, टॅक्सी सेवा आणि रेल्वेदेखील बंद राहिल्याने अनेक दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. कोरोनाच्या विरोधात हे युद्ध जिंकण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा होता. यामुळे लोकांनी आजच्या दिवशी घरातच राहणे पसंद केले. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशभरातून याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक लोकांसह संस्था-संघटनांनी स्वत: याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केल्याचा परिणाम रविवारी देशभर ठळकपणे दिसून आली.
टाळय़ा-घंटा-थाळीनादही घुमला
‘जनता कर्फ्यू’दरम्यान सायंकाळी पाच वाजता लोकांना घराबाहेर किंवा गॅलरीत येऊन थाळीनाद किंवा टाळय़ा वाजविण्याचा सल्ला देण्यात आला होता. या आवाहनालाही लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अनेक लोक आपल्या घराबाहेर किंवा गॅलरीत, खिडकीत किंवा छतावर येऊन आभार व्यक्त करताना दिसत होते. कोरोना विषाणूशी झुंज देण्यासाठी झटणाऱया डॉक्टर्स, परिचारक व परिचारिका, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, वृत्तपत्र विक्रते, जीवनावश्यक सेवा पुरविणारे लोक, व्यापारी, दूध विक्रेते, विविध संघटनांचे कार्यकर्ते व असंख्य संस्था-संघटनांचे आभार याप्रती व्यक्त करण्यात आले.