राजपथासह रस्ते झाले चिडीचूप
चंद्रकांत देवरुखकर/ सातारा
सातारा हे तसंच पेन्शर्न्स सिटी म्हणून ओळखली जात असली तरी दिवसभरांत किमान 22 तास तशी जागसूक असते. मध्य रात्री दोन ते चार ही वेळ सोडली तर शहर हालचालींत मग्न असतं. त्या मध्यरात्रीच्या किर्र अंधाऱया रात्री शहर जसं निस्तेज असतं अगदी तिच गत होती रविवारच्या भर दुपारची….. पोवईनाका असो की राजवाडा, राजपथ असो की खालचा रस्ता-राधिका रोड…. शाहूनगर असो कि शाहूपुरी….. सदर बझार असो कि करंजे…. सगळी कडे सुनसान व गंभिर शांतता पसरली होती. जणू ते निर्मुनूष्य रस्ते ‘राजधानी कोरोनाच्या विरोधात दंड थोपटून उभी राहिल्याच्या’ घोषणा देत असल्याचे जाणवत होते.
जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोनाचे सातारकरांना गेल्या दोन दिवसांत गांभीर्य येवू लागलंय. त्यातच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संपर्क, गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा काही ठराविक वेळेत सुरु केल्याने आता सातारकरांनी देखील कोरोनाला हरवण्यासाठी दंड थोपटले आहेत. शहरी भागासह आता उपनगरांत देखील कडकडीत लॉकडाऊन पाळू लागले आहेत. शनिवारपासूनच साताऱयातील रस्ते चिडीचूप झाले आहेत. शहरांतील रस्त्यांवर जी तुरळक गर्दी दिसत होती तीही रविवारपासून पुर्णतः नाहीशी झाली आहे. ‘कोरोनाला राजधानी आता हरवणार’ हा शहरवासियांचा निर्धार शब्दांविना जाणवत होता.
दरम्यान, शहरांतून खेडय़ात जाणाऱया किंवा खेडय़ातून शहरांत येणाऱया डॉक्टर्संना पोलिसांकडून अडवण्यात आल्याच्या घटना घडल्या. रुग्णसेवा देणाऱया डॉक्टर्संनी ठरवून दिलेल्या वेळेत रुग्ण तपासावेत, अशी विनंती असली तरी बंधन नाही. त्यांच्या वेळेत त्यांनी ओपीडी सुरु ठेवण्यास हरकत नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना स्पष्ट केले.
सातारा जिल्हय़ात परदेशातून आलेले दोन रुग्ण कोरोना बाधित सापडले. त्यातील एकाचा दुर्देवी मृत्यू झाला तर एक महिला कोरोनामुक्त होवून तिच्या घरी घेतलेल्या सुचनांप्रमाणे सामान्य जीवन जगत आहे. तर मुंबईहून संसर्गित होवून आलेल्या बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लॉकडाऊन कडक केला आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह अत्यावश्यक सेवाही मर्यादित केल्याने लॉकडाऊन यशस्वी करण्याचे सातारकरांनी चांगलेच मनावर घेतले. वर्दळ थंडावली असून शहरासह महामार्गा ओस आहेत. एक धीरगंभीर शांतता वातावरणात आली असून रस्ते चिडीचूप झाल्याचे रविवारी पहावयास मिळाले. जगभरातील प्रगत राष्ट्रांची अवस्था सर्व नागरिक पहात आहेत. तर दुसरीकडे भिलवाडा व सांगली जिल्हय़ाने लॉकडाऊन यशस्वी करत कोरोनावर केलेली मात दिशादर्शक ठरलीय आहे.
शहरांतील पोवईनाका, राजवाडा, राजपथ, खालचा रस्ता व राधिका रोड हे प्रमुख भाग दिवसभर चिडिचूप होते. तर पेठां व उपनगरांतील हालचालीही बंद होत्या.
साताऱयातील परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी मुंबईकरांनी चिंता वाढवल्याने आरोग्य विभागाने युध्द पातळीवर जिल्हय़ातील सर्व गावात पुणे, मुंबईसह इतर शहरातून आलेल्या नागरिकांचा सर्व्हे हाती घेतला आहे. तसेच सर्व सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी या मोहिमेत सक्रीय सहभागी होवून कोरोनाविरुध्दचा लढा देत आहेत. मात्र आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी नागरिक व प्रशासनाने अशीच एकजूट दाखवत जिल्हय़ावर आलेले संकट धुडकावून लावण्यासाठी कटिबध्द झाले पाहिजे.
महिलांच्या जनधन खात्यात जमा होणारे पाचशे रुपये आणि शेतकऱयांच्या खात्यात जमा होणारे 2 हजार काढण्यासाठी अनावश्यक गर्दी न करता खबरदारीचे आवाहन शेखर सिंह यांनी केले. नागरिकांनी बँकामध्ये न जाता, घराबाहेर न पडता बँक व्यवसाय प्रतिनिधीद्वारे आवश्यकता असेल तरच पैसे काढावेत. आपल्या जिह्यामध्ये सर्व बँकांचे एकूण 1038 व्यवसाय प्रतिनिधी जिह्याच्या विविध भागात कार्यरत आहेत. तसेच जिह्यामध्ये एकूण 468 एटीएम सेंटर्स आहेत. महिलांनी व नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा.









