वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाविरोधातील लढाईत आमच्या सहकाऱयांनी गौरवास्पद कामगिरी नोंदवली आहे. आम्ही यापुढेही राष्ट्र आणि मानवतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत, अशा शब्दात एअर इंडियाचे अध्यक्ष राजीव बन्सल यांनी आपल्या कर्मचाऱयांचा गौरव केला आहे.
पत्रात बन्सल यांनी म्हटले आहे की, एअर इंडियाने दोन आठवडय़ांमध्ये सुमारे 100 हून अधिक उड्डाणे केली. चीनमधील वुहानमध्ये जेव्हा कोरोनाने थैमान घातले होते. तेव्हा एअर इंडियाच्या कर्मचाऱयांनी आपल्या प्राणाची बाजी लावत कर्तव्य बजावले. विदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी आणले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय साहित्य पोहचविण्यात अग्रस्थानी राहिले. अत्यावश्यक वस्तुंच्या सेवेचा पुरवठा केल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई नियंत्रण विभागानेही एअर इंडियाचे विशेष आभार मानले. आमच्या प्रत्येक सहकाऱयावर आम्हाला गर्व आहे. त्यांनी प्राण धोक्यात घालून कोरोना विषाणूविरोधात लढाई लढली. त्यांच्या कामगिरीमुळे कोरोनातून मुक्त होण्याचा विश्वास वाढला आहे. सद्यःस्थितीमधील परिस्थिती आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. कोरोनाच्या साथीचा फैलाव झाल्यानंतर एअर इंडिया देशवासियांना मायदेशी आणण्यासाठी सज्ज झाली. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनुसार अनेक संकटावर मात करीत एअर इंडियाने जर्मनी, फ्रान्स, कॅनडा येथील नागरिकांनाही त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी सेवा दिली. तसेच विदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणले. एअर इंडियाची वैद्यकीय पथके 24 तास आपत्तकालीन सेवा बजावत आहे. आमच्यासाठी आमच्या कर्मचाऱयांचे आरोग्यही तेवढेच महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. एअर इंडियाने कर्मचाऱयांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यामुळे केवळ एकाच कर्मचाऱयाला कोरोनाची बाधा झाली. उपचारानंतर तो पूर्ण बरा झाला आहे. आम्ही यापुढेही राष्ट्र आणि मानवतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही बन्सल यांनी पत्रातून दिली आहे.









