नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पॅट कमिन्सनंतर माजी ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज ब्रेट लीने देखील भारताच्या कोव्हिड-19 विरुद्ध लढय़ात मदतीचा हात पुढे केला आहे. भारतातील इस्पितळांकरिता ऑक्सिजन पुरवठय़ाकरिता आपण 1 बिटकॉईन प्रदान करणार असल्याचे ब्रेट लीने मंगळवारी जाहीर केले. एका बिटकॉईनची सर्वसाधारणपणे 40 लाख रुपये इतकी किंमत असते. बिटकॉईनला भारतात कायदेशीर मान्यता नाही. पण, तरीही लीने मदतीकरिता हे माध्यम निवडणे पसंत केले. 44 वर्षीय ब्रेट लीने ऑस्ट्रेलियातर्फे 76 कसोटी, 221 वनडे व 25 टी-20 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे.
‘कोरोनामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, ते एकंदरीत चित्र भयावह आहे. भारत नेहमीच माझ्यासाठी सेकंड होम रहात आले आहे. भारतीय नागरिकांनी, चाहत्यांनी मला बरेच प्रेम, जिव्हाळा दिला आहे. मी खेळत असताना आणि अगदी निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी मला बरेच काही दिले आहे. सध्या कोरोनाविरुद्ध एकत्रित लढा देण्याची गरज आहे आणि त्यासाठी कमिन्सप्रमाणे मीही पुढाकार घेत आहे. नागरिकांनी घरीच थांबावे, अगदी गरज असेल तरच बाहेर पडावे, मास्क सातत्याने परिधान करावा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे’, असे आवाहन लीने यावेळी केले.









