केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची स्पष्टोक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने विविध उपायायोजना राबविल्या. त्यामुळे सर्वात वाईट दिवस आता गेले आहेत. मात्र जोपर्यंत कोरोनावर लस येईपर्यंत सर्वांनी दक्षता घेणे, सर्व सुचनांचे पालन करणे हाच उपाय आहे, असे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी स्पष्ट केले.
कोरोना संसर्गामुळे मागील 40 दिवसांमध्ये देशातील जनतेने अनेक चांगल्या सवयी आत्मसात केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर राखणे या बाबींचा यामध्ये समावेश आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यात अन्य देशांच्या तुलनेत कमालीचे यश आल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 4 मेपासून सुरू होईल. यावेळी अर्धाहून अधिक देशातील जनजीवन पूर्वपदावर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने सरकारवर केवळ निराधार आरोप करण्यात येत आहेत. एकही विधायक नवीन उपाय सुचवत नाहीत. पूर्वीच्या उपायांवर आता टीका करीत आहेत. वादविवादापेक्षा आमचा उद्देश हा सर्व राज्यांना मदत करण्याचा आहे, असेही जावडेकर म्हणाले.
आपल्याकडे आता गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची मोठी संधी आहे. आम्ही सर्व कंपन्यांचे स्वागत करतो. मागील सहा वर्षांमध्ये देशातील मोबाईल फोन निर्मिती कारखान्यांची संख्या दोनवरून 150वर पोहचली आहे. आम्ही आता कोरोनाबाधित रूग्णांवर उपचारावेळी वापरण्यात येणाऱया व्यक्तिगत सुरक्षा साधन (पीपीई) आणि व्हेंटीलेटर तयार करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.









