सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर यांचे आवाहन
प्रतिनिधी / कुडचडे
कोरोना महामारीवर मात करायची असल्यास आपण स्वतः सोशल डिस्टन्सिंग व इतर आवश्यक गोष्टींचे पालन करायला हवे. सर्व काही सरकारच करणार या भ्रमात न रहता याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन सावर्डे पंचायतीचे सरपंच संदीप पाऊसकर यांनी केले.
मीराबाग-सावर्डे येथील श्रीकृष्ण मंदिरात शिवसेनेचे माजी दक्षिण गोवा जिल्हाप्रमुख धनराज नाईक यांनी आयोजित केलेल्या मास्क, सेनिटायजर वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खास आमंत्रित या नात्याने वरुण कुडचडकर, स्थानिक पंच संजय नाईक, धनराज नाईक, संदीप नाईक आदी उपस्थित होते .
धनराज नाईक यांनी आयोजित केलेला उपक्रम अत्यंत चांगला आहे. कोरोना महामारीचा सामना सर्वांनी मिळून करायचा आहे. काही लोक विनाकारण बाजारात जातात. अशा प्रकारे गरज नसताना फिरू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्क वापरा, कोणाशीही हस्तांदोलन टाळा. बाहेरून घरात परताल तेव्हा आंघोळ करा, असे पाऊसकर यांनी सांगितले. धनराज नाईक म्हणाले की, हा कार्यक्रम घडवून आणण्यामागचा एकच हेतू आहे आणि तो म्हणजे लोकांना संक्रमणापासून दूर ठेवणे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी पूर्णता नव्हे, पण काही प्रमाणात तरी तोडता येणार. वरुण कुडचडकर यांनीही कोरोनाविरुद्ध कशी काळजी घ्यावी या विषयावर माहिती दिली.









